नोएडामध्ये शेतकऱ्यांनी नवीन भूसंपादन कायद्याच्या लाभांसाठी आंदोलन

बुलंद शहर, आग्रा, अलिगड तसेच अन्य काही जिल्ह्यांतील हजारो शेतकरी सहभागी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 10:44 am
नोएडामध्ये शेतकऱ्यांनी नवीन भूसंपादन कायद्याच्या लाभांसाठी आंदोलन

नवी दिल्ली : नवीन भूमी अधिग्रहण कायद्यातील सर्व लाभ दिले जावेत, विकसित जमिनीमध्ये दहा टक्क्यांची हिस्सेदारी द्यावी, यासह अन्य मागण्यांसाठी शेतकरी संघटनांनी दिल्लीच्या प्रवेशद्वारावर नोएडा येथे आंदोलन केले. शेतकऱ्यांनी सोमवारी केलेल्या आंदोलनामुळे वाहतुकीचा बोजवारा उडाला. प्रशासनाच्या विनंतीनंतर शेतकरी महामार्गावरून हटले. त्यानंतर त्यांनी दलित प्रेरणा स्थळावर आंदोलनास सुरुवात केली आहे.

पोलिस आणि प्रशासनासोबत झालेल्या चर्चेनंतर दलित प्रेरणा स्थळावर जाण्यास शेतकरी तयार झाले. जोवर मागण्या मान्य होत नाहीत तोवर आंदोलन सुरू राहील. सरकारने दखल घेतली नाही तर पुन्हा ''दिल्ली चलो'' ची हाक दिली जाईल, असे भारतीय किसान युनियनचे नेते बी. सी. प्रधान यांनी सांगितले.

आंदोलकांची संख्या वाढू नये, याकरिता नोएडा ते ग्रेटर नोएडा महामार्ग काही काळासाठी बंद ठेवण्यात आला होता. आंदोलनात सामील झालेल्या शेतकऱ्यांनी त्यांच्यासोबत ट्रॅक्टर आणले आहेत. आंदोलनात गौतम बुद्ध नगर, गाझियाबाद, बुलंद शहर, आग्रा, अलिगड तसेच अन्य काही जिल्ह्यांतील हजारो शेतकरी सामील झालेले आहेत.

या आहेत शेतकऱ्यांच्या मागण्या- 

भूसंपादनाच्या मोबदल्यात १० टक्के भूखंड मिळावा,  भूसंपादन मोबदला ६४.७ टक्के दराने मिळावा,  नव्या भूसंपादन कायद्यानुसार बाजारभावाच्या चारपटींनी  भरपाई, भूमिहीनांना रोजगार व पुनर्वसनाचे लाभ दिले जावेत

हेही वाचा