काही दिवसांपूर्वी तिने हैदराबादमध्ये केली होती आपल्या बॅडमिंटन अकादमीची पायाभरणी
भारताची स्टार बॅडमिंटनपटू पी व्ही सिंधूने नुकतंच सय्यद मोदी आंतरराष्ट्रीय स्पर्धा जिंकून जेतेपद पटकावले. जेतेपद पटकावल्यानंतर तिच्या आयुष्यात अजून एक आनंदाचा क्षण आला आहे. पी व्ही सिंधू २२ डिसेंबरला राजस्थामधील ‘लेक सिटी’ (तलावांचं शहर) उदयपूरमध्ये येथे हैदराबादचे उद्योगपती वेंकट दत्त साई यांच्याशी विवाहबद्ध होणार आहे.
वेंकट हे पोसिडेक्स टेक्नोलॉजी मध्ये कार्यकारी संचालक आहेत. जानेवारीपासून सिंधू सातत्याने स्पर्धांमध्ये सहभागी होत असून तिच्या या वेळापत्रकानुसारच लग्नाची तारीख ठरवली असल्याची माहिती सिंधूचे वडील पीव्ही रमण यांनी दिली होती.
२९ वर्षीय सिंधूने २०१९च्या सुवर्णपदकासह जागतिक अजिंक्यपद स्पर्धेत पाच पदके जिंकली आहेत.२०१६ मध्ये तिने ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक जिंकले आणि पाठोपाठ २०२०च्या ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदकाची कमाई केली. २०१७ मध्ये तिने जागतिक क्रमवारीत दुसऱ्या क्रमांकावर झेप घेतली होती. सिंधूने प्रतिष्ठित सय्यद मोदी स्पर्धा जिंकून पुनरागमन केले. इतकेच नाही तर काही दिवसांपूर्वी तिने हैदराबादमध्ये आपल्या बॅडमिंटन अकादमीची पायाभरणीही केली होती.