काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल

पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने त्यांना अजूनही उपचाराची गरज, डॉक्टरांचे अनुमान

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
03rd December, 02:59 pm
काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे वैद्यकीय तपासणीसाठी ज्युपिटर रुग्णालयात दाखल

मुंबई: महाराष्ट्रात नव्या सरकार स्थापनेआधी घडामोडींना वेग आला आहे. एकीकडे शपथविधीची तयारी सुरू असतानाच काळजीवाहू मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची प्रकृती बिघडली आहे. त्यांची डेंग्यू आणि मलेरियाची चाचणी केली. या चाचणीचा रिपोर्ट निगेटिव्ह आला असला तरी शिंदेंच्या पांढऱ्या पेशी कमी जास्त होत असल्याने त्यांना उपचाराची गरज आहे. मोठ्या प्रमाणात अशक्तपणा आला असल्याने शिंदेंना आता ज्युपिटर रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, शिंदे यांच्या घशाला इन्फेक्शन झाले आहे. 

गेल्या आठवड्यात एकनाथ शिंदे सातऱ्यातील दरे गावात गेले होते. दरे गावात गेल्यानंतर त्यांना १०५ इतका ताप आला होता. त्याशिवाय अशक्तपणाही होता. फॅमिली डॉक्टरांनी एकनाथ शिंदे यांना आराम करण्याचा सल्ला दिला होता. पण राज्यात सत्तास्थापनेच्या घडामोडी वेगात सुरू होत्या.त्यामुळे शिंदेंना मुंबईत परत यावे लागले. आता मुंबईमध्ये आल्यानंतरही शिंदेंच्या प्रकृतीमध्ये अद्याप सुधारणा झाल्याचे दिसले नाही. आज मंगळवारी एकनाथ शिंदेंची अमित शाह यांच्यासोबत नियोजित बैठक होती. मात्र प्रकृती पुन्हा खालावल्याने बैठक होणार नसल्याचे वृत्त आहे. 

तर दुसरीकडे ५ डिसेंबरला मुंबईतील आझाद मैदानावर होऊ घातलेल्या महायुती सरकारच्या शपथविधीची जोरदार तयारी सुरु आहे. या पार्श्वभूमीवर मंगळवारी सकाळी मंत्रालयात उच्चस्तरीय बैठक पार पडली. मुख्य सचिव सुजाता सौनिक यांच्या दालनामध्ये ही बैठक झाली. बैठकीला पोलीस महासंचालक रश्मी शुक्ला, प्रोटोकॉल विभागाच्या प्रधान सचिव मनिषा म्हैसकर आणि इतर अधिकारी उपस्थित होते. या बैठकीत ५ डिसेंबरला होणाऱ्या शपथविधी संदर्भात तयारीचा आढावा घेण्यात आला.

हेही वाचा