सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धा
पणजी : सय्यद मुश्ताक अली क्रिकेट स्पर्धेत रोमहर्षक झालेल्या गोवा विरुद्ध महाराष्ट्र सामन्यात गोव्याने महाराष्ट्राचा पराभव केला. अखेरच्या षटकात गोव्याने विजयासाठीच्या २० धावा पूर्ण केल्या. १९४ धावांचे लक्ष्य गोव्याने २० षटकांत ६ गडी गमावून गाठले.
तत्पूर्वी नाणेफेक जिंकून गोव्याने प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. महाराष्ट्राच्या सलामीवीरांनी आपल्या संघाला अपेक्षित सुरुवात मिळवून दिली. अर्शिन कुलकर्णी (४४ धावा) व अंकित बावने (५१) यांनी पहिल्या गड्यासाठी १०.५ षटकांत ९७ धावांची भागदारी केली. ही भागीदारी दीपराज गावकरने कुलकर्णीला धावबाद करत तोडली. यानंतर गोव्याला दुसरे यश लवकरच मिळाले. महाराष्ट्राच्या खात्यात आणखी सहा धावांची भर पडली असता दुसरा सलामीवीर बावनेही अर्धशतक करून माघारी परतला. त्याला इशान गडेकरने बाद केले. दोन गडी एका मागोमाग एक बाद झाल्यानंतर गोव्याचे गोलंदाज महाराष्ट्रवर दबाव आणतील असे वाटत होते मात्र महाराष्ट्राच्या फलंदाजांनी गोव्याच्या गोलंदाजांना वरचढ होऊ दिले नाही.
राहुल त्रिपाठी निखिल नाईक यांनी पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या डावाला वेगाने पुढे नेले. दोघांनी तिसऱ्या गड्यासाठी ३४ चेंडूंत ६१ धावांची भागीदारी केली व यात एकट्या निखिलचा वाटा ४० धावांचा होता. ही धोकादायक होणारी जोडी तोडण्यात दीपराज गावकरला यश आले. त्याने निखलला (४० धावा) बाद करत महाराष्ट्रला १७.२व्या षटकात १६४ धावांवर तिसरा धक्का दिला. यानंतर महाराष्ट्रने २० षटकांत ६ गडी गमावून १९३ धावा केल्या. गोलंदाजीत गोव्यातर्फे शुभम तारी व फेलिक्स आलेमाव यांनी प्रत्येकी २ गडी बाद केले तर दीपराज गावकरला एक यश मिळाले.
गोव्याच्या संघासमोर आता २० षटकांत १९४ धावांचे डोंगराएवढे मोठे लक्ष्य होते. मात्र गोव्याची सुरुवात अतिशय निराशाजनक झाली. गोव्याच्या खात्यात एकही धाव जमा झाली नसता गोव्याने २ गडी गमावले. इशान गडेकर व कश्यप बघले यांना खातेही उघडता आले नाही. यानंतर अजान थोटा व सुयश प्रभुदेसाई यांनी गोव्याच्या डावाला आकार देण्याचा प्रयत्न केला. मात्र पुन्हा एकदा गोव्याला ३.५व्या षटकात तिसरा धक्का बसला व अजान वैयक्तिक २३ धावा करून माघारी परतला.
गोव्याने तीन गडी लवकर गमावल्यानंतर सुयश प्रभुदेसाईने कर्णधार दीपराज गावकरसोबत मिळून गोव्याचा डाव पुढे नेणे सुरूच ठेवले. दोघांमध्ये चौथ्या गड्यासाठी ४० चेंडूंत ५६ धावांची भागीदारी झाली. गोव्याची ही जाेडी १०.३व्या षटकात तुटली. दीपराज गावकर २६ धावा करून एकूण ९० धावांवर बाद झाला.
एका बाजुला गडी बाद होत होते मात्र सुयशने आपला संघर्ष कायम ठेवला व पुन्हा एकदा दर्शन मिसाळसोबत भागीदारी करताना गोव्याच्या विजयाच्या आशा कायम ठेवल्या. दोघांनी पाचव्या गड्यासाठी ४२ चेंडूंत ६१ धावांची मोठी भागीदारी केली. विजयासाठी १५ चेंडूंत अजून ४४ धावांची गरज असताना दर्शनही २५ धावा करून बाद झाला तर पुढे विजयासाठी ७ चेंडूंत २१ धावांची गरज असताना सुयशही ६६ धावा करून बाद झाला. यानंतर गोव्याच्या चाहत्यांना पराभव स्पष्ट दिसू लागला.
आता खेळपट्टीवर विकास सिंग व मोहित रेडकर होते. यानंतर मैदानावर जे घडले त्याचा महाराष्ट्रानेही कधी विचार केला नसले. गोव्याला आता अखेरच्या ६ चेंडूंवर २० धावांची गरज होती व स्ट्राईकवर विकास होता. विकासने पहिल्याच चेंडूवर चौकार लगावत विजयाचे अंतर ५ चेंडूंत १६ धावा असे केले. यानंतर दुसऱ्या चेंडूवर अजून एक चौकार खेचत हे अंतर ४ चेंडूंत १२ धावांवर आणले. तिसऱ्या चेंडूवर विकासने आणखी एक चौकार खेचत गोव्याला विजयासाठी शेवटच्या तीन चेंडूंत ८ धावा शिल्लक ठेवल्या. चौथ्या चेंडूवर विकासने सुरेख षटकार खेचत गोव्यासमोर विजयाचे अंतर २ चेंडूंत केवळ दोन धावा असे केले. अखेर गोव्याने शेवटच्या दोन चेंडूंवर प्रत्येकी २ धावा करत महाराष्ट्राचा ४ गडी राखून पराभव केला. मोहित रेडकर १ चेंडूत ४ तर विकास ९ चेंडूंत ३१ धावा करून नाबाद राहिले.
गोव्याचा या स्पर्धेतील पहिला विजय
या स्पर्धेत गोव्याची कामगिरी विशेष राहिली नाही. मात्र महाराष्ट्रासारख्या संघाविरुद्ध गोव्याने विजय मिळवत स्पर्धेतील आपले गुणांचे खाते उघडले. पहिल्या सामन्यात मुंबईने गोव्याचा २६ धावांनी पराभव केला होता तर दुसऱ्या सामन्यान सेनादलाने २२ धावांनी पराभव केला होता. तिसऱ्या सामन्यात आंध्रने गोव्याविरुद्ध ८ गडी राखून विजय मिळवला हाशता तर चौथ्या सामन्यात केरळने गोव्याचा ११ धावांनी पराभव केला होता.