सराव सामन्यात पीएम इलेव्हनचा ६ गड्यांनी केला पराभव
कॅनबेरा :कॅनबेरा येथे रविवारी झालेल्या सराव सामन्यात भारताने शानदार विजयाची नोंद केली. टीम इंडियाने पीएम इलेव्हनचा ६ गड्यांनी पराभव केला. भारताकडून शुभमन गिलने दमदार कामगिरी करत अर्धशतक झळकावले. तर वॉशिंग्टन सुंदरने ४२ धावांची स्फोटक खेळी खेळली. हर्षित राणाने अप्रतिम गोलंदाजी करताना सर्वाधिक ४ बळी घेतले. दुसऱ्या कसोटी सामन्यापूर्वी टीम इंडियासाठी हा अप्रतिम विजय आहे.
या सामन्याच्या पहिल्या दिवसाचा खेळ पावसामुळे रद्द करण्यात आला, तर दुसऱ्या दिवसाच्या खेळात दोन्ही संघांनी ४६-४६ षटके खेळण्याचा निर्णय घेतला. या सामन्यात टीम इंडियाचा कर्णधार रोहित शर्माने नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करण्याचा निर्णय घेतला. यानंतर हर्षित राणाने भेदक गोलंदाजी करत यजमान संघाला आपल्या पुढे गुडघे टेकायला भाग पाडले. भारतीय गोलंदाजांच्या उत्कृष्ट कामगिरीमुळे ऑस्ट्रेलियन पीएम इलेव्हन संघ ४३.२ षटकात २४० धावांवरच गारद झाला. या सामन्यात भारतीय संघाच्या गोलंदाजीत हर्षित राणाने अप्रतिम कामगिरी करत एकूण ४ बळी आपल्या नावावर केले.
त्याने ६ षटके गोलंदाजी करताना ४४ धावा देत ४ बळी घेतले. यादरम्यान राणाने आपल्या शानदार गोलंदाजीने दोन फलंदाजांना त्रिफळचीत केले. राणाने जॅक क्लेटन, ऑलिव्हर डेव्हिस, जॅक एडवर्ड्स आणि सॅम हार्पर यांना तंबूचा रस्ता दाखवला. यानंतर भारतीय संघ फलंदाजीसाठी उतरला. टीम इंडियाने ४६ षटके फलंदाजी करत ४ गडी गमावून २५७ धावा केल्या. भारताची धावसंख्या ऑस्ट्रेलियापेक्षा जास्त होती. त्यामुळे टीम इंडियाला या सामन्यात विजयी घोषित करण्यात आले.हर्षित राणा व्यतिरिक्त आकाश दीपलाही दोन दिवसीय सराव सामन्यात गोलंदाजी करण्याची संधी मिळाली, ज्यात त्याने दोन विकेट्स घेतल्या. याशिवाय मोहम्म सिराज, प्रसिद्ध कृष्णा, वॉशिंग्टन सुंदर आणि रवींद्र जडेजा यांनीही प्रत्येकी एक विकेट्स घेतली. या सामन्यात रविचंद्रन अश्विनला गोलंदाजी करण्याची संधी मिळाली नाही. अशाप्रकारे हर्षित राणा व्यतिरिक्त आकाश दीपने आपल्या धारदार गोलंदाजीने सर्वांचे लक्ष वेधून घेतले.
रोहित शर्माने तिसऱ्या क्रमांकावर खेळणार
रोहितने प्राईम मिनिस्टर इलेव्हन विरूद्धच्या सराव सामन्यात स्वत:बाबत निर्णय घेत मोठा आदर्श घालून दिला आहे. टीम इंडियासाठी या बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील दुसरा सामना महत्त्वाचा आहे. रोहित त्याच्या मुलाच्या जन्मानंतर काही दिवसांनंतर भारतीय संघासोबत जोडला गेला आहे. त्याआधी रोहितच्या अनुपस्थितीत यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल या दोघांनी पर्थमध्ये झालेल्या पहिल्या कसोटीत सलामी दिली होती. पहिल्या डावात टीम इंडियाचे फलंदाज अपयशी ठरले. मात्र दुसऱ्या डावात केएल आणि यशस्वी या दोघांनी विक्रमी सलामी भागीदारी केली. या जोडीने टीम इंडियाच्या विजयात निर्णायक भूमिका बजावली.
आता रोहित परत आलाय. त्यामुळे रोहित आणि यशस्वी ओपनिंग करणार, हे असे निश्चित होते. तसेच दुसरा कसोटी सामना हा डे नाईट असून गुलाबी चेंडूने खेळवण्यात येणार आहे. त्याआधी दोन्ही संघांचा सराव व्हावा, म्हणून उभयसंघात मॅच खेळवण्यात आली. मात्र या सामन्यात रोहित ओपनिंगला न येता तिसऱ्या स्थानी बॅटिंगला आला. त्यामुळे रोहित दुसऱ्या कसोटीत ओपनिंग करणार नसल्याचे स्पष्ट संकेत मिळाले आहेत. तसेच यशस्वीसोबत ओपनिंगसाठी केएल सेट झाल्याने त्यालाच दुसऱ्या सामन्यातही सलामीला पाठवायचे हे, रोहितच्या या निर्णयावरुन स्पष्ट झाले आहे. रोहितने टीम इंडियाच्या फायद्यासाठी सराव सामन्यात त्याचे सलामीचे स्थान सोडले आहे. आता रोहित दुसऱ्या कसोटी सामन्यात कितव्या स्थानी फलंदाजीला येतो, हे पाहणे औत्सुक्याचे ठरणार आहे.
शुभमन गिलचे अर्धशतक
टीम इंडियाच्या विजयात हर्षीत राणासह शुभमन गिलने महत्त्वाची भूमिका बजावली. शुभमनने धावांचा पाठलाग करताना अर्धशतक झळकावले. या सामन्यात गिलने ६२ चेंडूत ५० धावा केल्या. दुसरीकडे जैस्वालनेही ४५ धावांची खेळी केली.