जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये गुकेश, लिरेन पुन्हा बरोबरीत

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
29th November, 09:31 pm
जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपमध्ये गुकेश, लिरेन पुन्हा बरोबरीत

सिंगापूर : भारतीय ग्रँडमास्टर डी गुकेश आणि गतविजेता डिंग लिरेन यांनी शुक्रवारी येथे जागतिक बुद्धिबळ चॅम्पियनशिपच्या चौथ्या गेममध्ये बरोबरी साधली. या बरोबरीमुळे दोन्ही खेळाडूं एकसमान गुणाने बरोबरीत आहेत.

दोन्ही खेळाडूंनी ४२ चालीनंतर खेळ बरोबरीत सोडवण्याचे मान्य केले. अशाप्रकारे, १४ फेऱ्यांच्या या सामन्यात चार फेऱ्यांनंतर दोन्ही खेळाडू प्रत्येकी दोन गुणांसह बरोबरीत आहेत. वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये खेळणारा सर्वात तरुण खेळाडू १८ वर्षीय गुकेशने बुधवारी तिसरा गेम जिंकून सामना बरोबरीत आणला होता.

सामन्यानंतर गुकेश म्हणाला, खेळ संपण्याच्या जवळ असल्याने मला काही संधी मिळाल्या होत्या, पण काळ्या मोहरांसह खेळून तुम्ही अशाच निकालांची अपेक्षा करू शकता. गुकेशला सर्वात तरुण जगज्जेता बनण्याच्या शक्यतेबद्दल विचारले असता तो म्हणाला, सध्या मी फक्त चांगल्या चाली करण्यावर लक्ष केंद्रित करत आहे.

चीनचा ३२ वर्षीय खेळाडू लिरेनने पहिला गेम जिंकून चांगली सुरुवात केली होती. दुसरा सामना अनिर्णित राहिला. लिरेन म्हणाला, मला कोणत्याही प्रकारचा धोका पत्करायचा नव्हता. मागील सामन्यातील पराभवातून सावरण्यासाठी मला एक दिवस विश्रांती घेण्याची संधी मिळाली. मी खूप चांगल्या मूडमध्ये आहे. मला विश्रांतीचा फायदा झाला.

विश्व चॅम्पियनशिप जिंकणारा विश्वनाथन आनंद हा एकमेव भारतीय खेळाडू आहे. त्याने आपल्या शानदार कारकिर्दीत पाच वेळा ही कामगिरी केली होती.