मध्यरात्री पोलिसांनी मारला छापा : सट्टयात कोट्यवधींची उलाढाल उघड

बीड : महाराष्ट्रातील (Maharashtra) बीड जिल्ह्यातील जंगल (Forest) परिसरात सुरू असलेल्या ऑनलाईन सट्टा रॅकेटचा (Online Gambling Racket) पोलिसांनी मध्यरात्री छापा टाकून पर्दाफाश केल्याने एकच खळबळ उडाली आहे. नेकनूरपासून केवळ ११ किलोमीटर अंतरावर असलेल्या कारेगव्हाण परिसरात ‘महादेव ॲप’ आणि ‘लोटस ऑनलाईन गेम’च्या माध्यमातून कोट्यावधी रुपयांची बेकायदेशीर उलाढाल सुरू असल्याची माहिती वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना मिळाली. त्यानंतर ही कारवाई करण्यात आली.
जिल्हा पोलीस (District Police) अधीक्षक नवनीत काँवत यांनी कारवाईचा आदेश दिल्यानंतर बीड (Beed) मुख्यालयातील पोलिसांनी मध्यरात्री १ ते २ च्या दरम्यान कारेगव्हाण परिसरातील जंगलसदृश ठिकाणी छापा टाकला. या कारवाईत त्याठिकाणी ऑनलाईन सट्टा सुरू असल्याचे दिसून आले. लोटस ऑनलाईन गेमद्वारे हा सट्टा सुरू होता. पोलिसांनी घटनास्थळावरून १५ मोबाईल फोन आणि चार लॅपटॉप जप्त केले असून चौघांना अटक केली आहे.
कोट्यावधींचे बेकायदेशीर व्यवहार
जप्त केलेल्या मोबाईल व लॅपटॉपच्या प्राथमिक तपासणीत या सट्टा व्यवहारातून कोट्यावधी रुपयांची उलाढाल झाल्याचे प्रथमदर्शनी दिसून आले आहे. आरोपींकडे तब्बल २०० हून अधिक बँक अकाऊंट्स तसेच महादेव ॲपशी संबंधित अकाऊंट्स आढळून आले असून; त्यांची सखोल तपासणी सुरू आहे.
चार जणांना अटक; परदेशी कनेक्शनचा संशय
या छाप्यात चौघांना अटक करण्यात आली आहे. मोबाईल तपासणीत अटक करण्यात आलेल्यांचे थेट परदेशी कनेक्शन असल्याचे संकेत मिळत असून, आंतरराष्ट्रीय स्तरावर हे सट्टा रॅकेट कार्यरत असल्याचा संशय व्यक्त केला जात आहे.
नेकनूर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. ग्रामीण भागात एवढ्या मोठ्या प्रमाणावर ऑनलाईन सट्टा सुरू असल्याचे उघड झाल्याने; जिल्ह्यात मोठी खळबळ माजली आहे. पोलिसांकडून या प्रकरणाचा अधिक तपास सुरू आहे.