मुंबई सिटी एफसीची हैदराबाद एफसीवर १-० अशी मात

इंडियन सुपर लीग : मेहताब सिंग विजयाचा शिल्पकार

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
15 hours ago
मुंबई सिटी एफसीची हैदराबाद एफसीवर १-० अशी मात

मुंबई : इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) साखळी फेरीतील सॅटर्डे स्पेशल लढतीत शनिवारी मुंबई सिटी एफसीने घरच्या मैदानावर हैदराबाद एफसीवर १-० अशी मात करताना दमदार पुनरागमन केले. डिफेंडर मेहताब सिंगने २९व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.
मुंबई सिटी एफसीची होमग्राउंडवरील सलग दुसरी लढत होती. मागील लढतीत त्यांचा पंजाब एफसीकडून ०-३ असा पराभव झाला. त्यामुळे हैदराबाद एफसीविरुद्ध यजमानांची प्रतिष्ठा पणाला लागली होती. मात्र, मुंबई फुटबॉल अरेनावर दडपण न घेता खेळ उंचावत यजमानांनी महत्त्वपूर्ण विजयाची नोंद केली.
स्ट्रायकर लालियानझुआला छांगटेच्या अप्रतिम क्रॉसवर मेहताब सिंगने मुंबई सिटी एफसीचे खाते उघडले. यावेळी स्ट्रायकर छांगटेने त्याच्या नावावर अनोख्या विक्रमाची नोंद केली. आयएसएलमध्ये मुंबई सिटीसाठी त्याने आजवर सर्वाधिक गोल योगदान दिले आहे. छांगटेने २१ गोल करतानाच १५ गोल करण्यात मदत करताना टीमसाठीचे एकूण योगदान ३६वर नेले. त्याने बिपीन सिंगला मागे टाकले. त्याने २४ गोल करताना ११ गोल असिस्ट केलेत.
पूर्वार्धात आघाडी घेत मुंबई सिटी एफसीने हैदराबाद एफसीवर वर्चस्व राखले. त्याचे क्रेडिट डिफेंडर मेहताब सिंगला जाते. लालियानझुआला छांगटेच्या सुरेख क्रॉसवर मेहताबने परफेक्ट हेडरने प्रतिस्पर्ध्यांची बचावफळी भेदली. पहिल्या दहा मिनिटांमध्ये ३ पेनल्टी कॉर्नर मिळवत यजमानांनी त्यांचा इरादा स्पष्ट केला. लालियानझुआला छांगटे, मेहताब सिंग, जॉन टोरल, निकोलाओस कॅरेलिस यांनी दुसर्‍या बाजूने हैदराबाद एफसीच्या बचावफळीवर आक्रमण कायम सुरू ठेवले. २६, २७ आणि २८व्या मिनिटाला आणखी तीन पेनल्टी कॉर्नर घेत मुंबई सिटी एफसीने दबाव कायम ठेवला. त्याचे फलस्वरूप २९व्या मिनिटाला प्रतिस्पर्ध्यांवर दडपण आणताना यजमानांनी खाते उघडले. अतिरिक्त वेळेत आणखी एक पेनल्टी कॉर्नर मिळवत पेनल्टी कॉर्नरची संख्या सातवर नेली.
पिछाडीवर पडलेल्या हैदराबाद एफसीने मध्यंतरानंतर आक्रमक पवित्रा घेतला. रामलुंछुंगाने ५५व्या मिनिटाला ऑन टार्गेट चेंडू मारताना टीमसाठी पेनल्टी कॉर्नर मिळवला. मात्र, त्यावर गोल करण्यात त्यांना अपयश आले. दुसरीकडे, मुंबई सिटी एफसीकडून विक्रम प्रताप सिंग, बिपिन सिंगने आघाडी वाढवण्यासाठी सुरेख प्रयत्न केले. मात्र, यावेळी प्रतिस्पर्ध्यांची बचावफळी सतर्क होती. निर्धारित वेळेपूर्वी, शेवटच्या दोन मिनिटांत दोन पेनल्टी कॉर्नर मिळवल्याने हैदराबाद एफसीच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या. मात्र, यजमानांच्या बचाव फळीने कुठलीही चूक केली नाही.
मुंबई सिटी एफसीची सहाव्या स्थानी झेप
शनिवारच्या विजयानंतर मुंबई सिटी एफसीने सामन्यांतून तिसर्‍या विजयासह गुणसंख्या १३वर नेत पॉइंट्स टेबलमध्ये सहाव्या स्थानावर झेप घेतली. हैदराबाद एफसीचा हा सलग दुसरा विजय आहे. ९ सामन्यांतून २ विजय आणि ६ पराभवांसह त्यांच्या खात्यात ७ गुण आहेत.
......
निकाल : मुंबई सिटी एफसी १(मेहताब सिंग २९व्या मिनिटाला) विजयी वि. हैदराबाद एफसी ०