एफसी गोवाची विजयाची हॅट्ट्रिक

केरला ब्लास्टर्स एफसीवर १-० ने मात, बोरिस सिंगचा एकमेव गोल निर्णायक

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
28th November, 11:58 pm
एफसी गोवाची विजयाची हॅट्ट्रिक

कोची : केरळा ब्लास्टर्सला त्यांच्या घरच्या मैदानावर १-० असे हरवून एफसी गोवाने इंडियन सुपर लीगच्या (आयएसएल) यंदाच्या हंगामात सलग तिसरा विजय नोंदवला. जवाहरलाल नेहरू आंतरराष्ट्रीय स्टेडियमवर गुरुवारी झालेल्या सामन्यात आक्रमक डिफेंडर बोरिस सिंगने ४०व्या मिनिटाला केलेला एकमेव गोल निर्णायक ठरला.
दोन्ही संघांनी मागील होम लढतीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांवर विजय मिळवल्याने गुरुवारच्या सामन्याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. केरळा ब्लार्स्टसनी चेन्नईयिन एफसीचा ३-० असा धुव्वा उडवत सलग तीन पराभवांची मालिका खंडित केली होती. परिणामी, घरच्या मैदानावर सलग दुसर्‍या सामन्यात यजमान संघाकडून त्यांच्या चाहत्यांच्या अपेक्षा वाढल्या होत्या. मात्र, त्यांनी सर्व आघाड्यांवर निराशा केली. एफसी गोवानेही मागील लढतीत घरच्या पाठिराख्यांसमोर पंजाब एफसीला चुरशीच्या लढतीत २-१ असे रोखले होते. कामगिरीत सातत्य राखताना त्यांनी सलग तिसर्‍या विजयाची नोंद केली.
पिछाडीवर पडलेल्या केरळा ब्लास्टर्स एफसीकडे उत्तरार्धात पुनरागमनाची अपेक्षा होती. मात्र, आणखी दोन पेनल्टी कॉर्नरसह गोल करण्याच्या अनेक संधी असूनही त्यांची गोलपाटी कोरी राहिली. नोह सदाओईने अनेक वेळा प्रतिस्पर्ध्यांकडून चेंडू हिरावून घेतला. मात्र, त्याला अन्य सहकार्‍यांची साथ लाभली नाही. पेनल्टी कॉर्नरवर गोल करण्यात आलेले अपयश यजमानांच्या पराभवाचे आणखी एक कारण ठरले. दुसर्‍या सत्रात एफसी गोवाने दोन पेनल्टी कॉर्नरची कमाई केली. मात्र, त्यावर त्यांना गोल करता आला नाही. ब्रिसन फर्नांडेस, बोर्जा हेरेरा आणि बोरिस सिंगने प्रतिस्पर्ध्यांचा बचाव मोडून काढताना टीमची आघाडी कायम राखण्यात मोलाचा वाटा उचलला.
तत्पूर्वी, मध्यंतराला १-० अशी आघाडी घेत पाहुण्यांनी यजमानांवर दडपण आणले. ४० व्या मिनिटाला साहील तावोराच्या अप्रतिम पासवर बोरिस सिंगने चेंडूवर नियंत्रण मिळवत गोलपोस्टच्या उजव्या बाजूने उजव्या पायाने चेंडूला अचूक गोलजाळ्यात टाकले. पहिल्या सत्राचा विचार करता केरळा ब्लास्टर्स एफसीने एफसी गोवाच्या तुलनेत चेंडूवर नियंत्रण राखण्यासह (५४.३-४५.७ टक्के) पेनल्टी कॉर्नर मिळवण्यात (२-०) आघाडी घेतली. परंतु, मध्यंतराला ५ मिनिटे शिल्लक असताना एफसी गोवाने एक आक्रमक आणि प्रभावी सेट-पीसचे प्रात्यक्षिक घडवताना यजमानांचा बचाव यशस्वीपणे भेदला.
सामन्यातील तिसर्‍याच मिनिटाला राहुल कन्नोळी प्रवीणच्या पासवर नोह सदाओईने गोल करण्याचा प्रयत्न केला. मात्र, चेंडू उजव्या कॉर्नरने बाहेर गेला. ११व्या मिनिटाला विपिन मोहननने मारलेला जोरकस फटका अचूकपणे अडवण्यात आला. ३१व्या मिनिटाला केरळा ब्लास्टर्सला पहिला पेनल्टी कॉर्नर मिळाला. मात्र, ओडेई ओनेन्डियाने तो व्यवस्थित क्लियर केला. अतिरिक्त वेळेत यजमानांना आणखी एका पेनल्टी कॉर्नरद्वारे बरोबरी करण्याची संधी होती. मात्र, त्यात त्यांना अपयश आले.
एफसी गोवानेही आक्रमक सुरुवात केली. कार्ल मॅकह्युग, डेजॅन ड्रॅझिक, इकेर ग्वारोटक्सेनाने काही चांगले प्रयत्न केले. मात्र त्यांचे प्रयत्न अपुरे पडले. मात्र, ४०व्या मिनिटाला साहील तावोरा आणि बोरिस सिंगच्या सुरेख ताळमेळमुळे पाहुण्यांनी आघाडी घेतली.
एफसी गोवा पाचव्या स्थानी
गुरुवारच्या विजयानंतर एफसी गोवाचे ९ सामन्यांतून ४ विजय, तीन बरोबरी आणि २ पराभवांसह १५ गुण झाले. ताज्या गुणतालिकेत ते पाचव्या स्थानी आहेत. यजमान केरळा ब्लास्टर्स एफसीला १० सामन्यांतून पाचवा पराभव पाहावा लागला. त्यांच्या खात्यात आता ११ गुण आहेत.
निकाल:
केरला ब्लास्टर्स एफसी ० पराभूत
वि. एफसी गोवा १ (बोरिस सिंग ४०व्या मिनिटाला)