मोहम्मद अमनच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताची जपानवर २११ धावांनी मात

१९ वर्षांखालील आशिया चषक : कार्तिकेय, म्हात्रेची शतकी खेळी

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
02nd December, 10:03 pm
मोहम्मद अमनच्या नाबाद शतकाच्या जोरावर भारताची जपानवर २११ धावांनी मात

शारजहा : कर्णधार मोहम्मद अमनचे नाबाद शतक आणि केपी कार्तिकेय आणि सलामीवीर आयुष म्हात्रे यांच्या अर्धशतकांच्या जोरावर भारताने सोमवारी येथे १९ वर्षांखालील आशिया चषक स्पर्धेतील ‘अ’ गटातील सामन्यात जपानचा २११ धावांच्या मोठ्या फरकाने पराभव केला. सहा गड्यांच्या मोबदल्यात ३३९ धावा केल्यानंतर भारताने जपानला आठ बाद १२८ धावांवर रोखले.

अमनने ११८ चेंडूंत नाबाद शतकी खेळी करताना सात चौकारांच्या मदतीने १२२ धावा केल्या. कार्तिकेयने ४९ चेंडूंत ५७ धावांच्या खेळीत पाच चौकार व एक षटकार लगावला, तर म्हात्रेने २९ चेंडूंत ६ चौकार व चार षटकारांच्या मदतीने ५४ धावा केल्या.

प्रथम फलंदाजीसाठी आमंत्रित केले असता सी आंद्रे सिद्धार्थ (३८), हार्दिक राज (नाबाद २५) आणि वैभव सूर्यवंशी (२३) यांनीही भारतीय संघासाठी उपयुक्त योगदान दिले. जपानतर्फे ह्यू केली आणि किफर यामामोटो-लेकने प्रत्येकी दोन गडी बाद केले.

लक्ष्याचा पाठलाग करताना जपानचा संघ आठ गडी गमावून केवळ १२८ धावा करू शकला. जपानला ऑलआऊट करण्यात अपयशी ठरल्यानंतर भारतीय संघाची मात्र निराशा झाली. दोन विकेट घेणाऱ्या केलने १११ चेंडूंत ५० धावा केल्या. चार्ल्स हिन्झे ३५ धावांवर नाबाद राहिला. भारताकडून कार्तिकेय, हार्दिक राज आणि चेतन शर्मा यांनी प्रत्येकी दोन गडी बाद केले.

पहिल्या सामन्यात भारताचा पाकिस्तानकडून पराभव

स्पर्धेतील सलामीच्या सामन्यात भारताला कट्टर प्रतिस्पर्धी पाकिस्तानकडून ४३ धावांनी पराभव पत्करावा लागला होता. बुधवारी गट टप्प्यातील शेवटच्या सामन्यात संघ संयुक्त अरब अमिराती (यूएई) विरुद्ध खेळेल. प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ ६ डिसेंबर रोजी होणाऱ्या उपांत्य फेरीसाठी पात्र ठरतील. स्पर्धेचा अंतिम सामना ८ डिसेंबर रोजी होणार आहे.

पाकिस्तानकडून यूएईचा पराभव

शाहजेब खान (१३२) आणि मुहम्मद रियाझुल्लाह (१०६) यांच्या उत्कृष्ट शतकी खेळी आणि अब्दुल सुभान (६ बळी) यांच्या दमदार गोलंदाजीमुळे पाकिस्तानने ‘अ’ गटातील सामन्यात संयुक्त अरब अमिरातीचा (यूएई) ६९ धावांनी पराभव केला. नाणेफेक गमावल्यानंतर पाकिस्तानने ५० षटकांत ३ गडी गमावून ३१४ धावा केल्या होत्या.