भारतीय संघासाठी सलामीवीरांचा तिढा

बॉर्डर गावस्कर ट्रॉफी : रोहित शर्माच्या पुनरामनामुळे संघात होणार बदल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
27th November, 11:51 pm
भारतीय संघासाठी सलामीवीरांचा तिढा

अॅडलेड : गोवन वार्ता बॉर्डर गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाचा २९५ धावांनी पराभव केला. पहिल्या कसोटीमधील विजयानंतर आता टीम इंडियाचा आत्मविश्वास सातव्या उंचीवर पोहोचलेला आहे. न्यूझीलंडविरुद्ध तीन कसोटी सामने गमावल्यानंतर पर्थ कसोटीमधील विजय टीम इंडियासाठी संजीवनी ठरला. अशातच आता दुसऱ्या कसोटीत टीम इंडियाची ताकद वाढली आहे. टीम इंडियाचा स्टार सलामीवीर फलंदाज आणि कर्णधार रोहित शर्माचे दुसऱ्या कसोटीपूर्वी कमबॅक झाले आहे. रोहित शर्माच्या पुनरागमनाने टीम इंडियासमोर सलामीवीराचा तिढा उभा राहिला आहे.
भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील कसोटी मालिकेतील दुसरा सामना ६ डिसेंबरपासून ॲडलेडमध्ये खेळवला जाणार आहे. हा सामना डे नाईट असेल, म्हणजे हा सामना गुलाबी चेंडूने खेळला जाणार आहे. या सामन्यात रोहित शर्मा टीम इंडियामध्य एन्ट्री करेल. त्यामुळे आता केएल राहुल याचा पत्ता कट होणार का? असा सवाल विचारला जात आहे. एकीकडे यशस्वी जयस्वाल याची जागा सुरक्षीत असताना आता केएल राहुलला बाहेरचा रस्ता दाखवणार की क्रमांक तीनवर खेळवणार, अशी देखील चर्चा होताना दिसत आहे. एकीकडे शुभमन गिल जखमी असल्याने त्याच्या जागी आलेल्या देवदत्त पेडिक्कल याला बाहेरचा रस्ता दाखवला जाऊ शकतो.
देवदत्त पेडिक्कल याला बेंचवर बसवून रोहित शर्मा किंवा केएल राहुल नंबर तीनवर खेळू शकतात. एकीकडे केएल राहुल चांगल्या फॉर्ममध्ये असताना रोहित शर्मा पुन्हा त्याला खालच्या क्रमांकावर खेळवणार का, असा सवाल विचारला जात आहे.
दरम्यान, ऑस्ट्रेलियन संघाने आतापर्यंत खेळलेल्या गुलाबी चेंडूच्या सर्व कसोटी जिंकल्या आहेत. त्यामुळे हा सामना जिंकण्याचा भारतीय संघाचा प्रयत्न असणार आहे. दुसरा कसोटी सामना गुलाबी बॉलने डे नाईट खेळवला जाणार असल्याने वेगवान गोलंदाजांना पुन्हा संधी मिळेल, अशीच शक्यता सध्यातरी वर्तविली जात आहे.
दुसऱ्यांदा बाबा झाल्याने पहिल्या सामन्याला मुकणारा रोहित शर्मा दुसऱ्या सामन्यापासून पुन्हा संघाची धुरा सांभाळणार आहे. भारत या मालिकेत १-०ने आघाडीवर आहे. जर भारताने दुसरी कसोटी जिंकली, तर रोहित शर्मा हा ऑस्ट्रेलिया विरूद्ध सर्वाधिक विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत संयुक्तपणे दुसरे स्थान पटकावेल.
विराट, रहाणे, गांगुलीशी बरोबरीची संधी
रोहित शर्माने आतापर्यंत ऑस्ट्रेलिया विरुद्ध चार कसोटीत भारतीय संघाचे नेतृत्व केले आहे. त्यापैकी दोन सामन्यात भारताने विजय मिळवला आहे. रोहितला खास यादीत प्रवेश मिळण्यासाठी एका विजयाची गरज आहे. रोहितने दुसरी कसोटी जिंकली तर ऑस्ट्रेलियाविरूद्ध सर्वाधिक कसोटी विजय मिळवणाऱ्या भारतीय कर्णधारांच्या यादीत तो विराट कोहली, अजिंक्य रहाणे आणि सौरव गांगुली यांच्यासह संयुक्तपणे दुसऱ्या क्रमांकावर येईल. या यादीत १३ पैकी ८ विजयांसह महेंद्रसिंग धोनी अव्वलस्थानी आहे.

रिकी पाँटिंग मागे टाकण्याची संधी
तसेच रोहितला रिकी पाँटिंगला मागे टाकण्याची संधी आहे. रिकी पाँटिंगने बॉर्डर-गावसकर मालिकेत २ सामनेच जिंकले आहेत. रोहितने आणखी सामना जिंकल्यास तो पाँटिंगच्या पुढे जाईल.
गिल दुसऱ्या सामन्याला मुकणार
गिल बोटाच्या दुखापतीमुळे पहिला कसोटी सामना खेळू शकला नव्हता. पर्थ कसोटीपूर्वीच्या सराव सामन्यादरम्यान त्याच्या अंगठ्याला दुखापत झाली होती. आता समोर आलेल्या ताज्या रिपोर्ट्सनुसार, तो दुसऱ्या सामन्यातही खेळण्याची शक्यता कमी आहे. गिलला दुखापत झाल्यानंतर त्याला १० ते १५ दिवसांच्या आरामाचा सल्ला देण्यात आला होता. तो दुसऱ्या कसोटीपूर्वी सराव सामना खेळणार नाही. सध्या त्याची दुसऱ्या कसोटीत खेळण्याची शक्यताही कमीच आहे. दुखापत बरी झाल्यानंतरही त्याला कसोटी सामना खेळण्यासाठी सरावाची आवश्यकता असेल.

टीम इंडियाची संभाव्य प्लेइंग इलेव्हन
रोहित शर्मा (कर्णधार), यशस्वी जैस्वाल, केएल राहुल, विराट कोहली, ऋषभ पंत, ध्रुव जुरेल/देवदत्त पडिक्कल, वाशिंग्टन सुंदर, नितीश रेड्डी, हर्षित राणा, जसप्रीत बुमराह, मोहम्मद सिराज.