वारंवार होणाऱ्या दहशतवादी कारवायांमुळे श्रीलंका अ संघाने आपला दौरा अधर्वट सोडला आहे.
मुंबई : येत्या फेब्रुवारीत पाकिस्तानमध्ये चॅम्पियन्स ट्रॉफी खेळवली जाणार आहे. यासाठी पाकिस्तानात जय्यत तयारी देखील सुरू आहे. याच अनुषंगाने येथे अनेक नवीन स्टेडियम आणि पायबहुत सुविधांची उभारणी केली जात आहे. पण मुद्दा आहे तो भारतीय क्रिकेटसंघाचा. तर भारतीय संघ पाकिस्तानात क्रिकेट खेळणार नाही असे बीसीसीआयने अनेकवेळा स्पष्ट केले आहे. बऱ्याचदा पीसीबीच्या विनंतीवरुन आयसीसीने देखील या मुद्यात मध्यस्थी केली, पण स्थिती जैसे थेच राहिली.
उद्या २९ नोव्हेंबर रोजी याच मुद्यावर पुन्हा आयसीसीची बैठक होत असून यात विविध पैलूंवर चर्चा केली जाईल. जर पीसीबीने या स्पर्धेचे आयोजन केले नाही तर भारतही या स्पर्धेचे आयोजन करण्यास तयार आहे. अंतिम स्थळ कोणते ? यावरही निर्णय उद्याच घेतला जाईल. दरम्यान, केंद्र सरकारने बीसीसीआयला स्पष्टपणे सांगितले आहे की टीम इंडिया चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी पाकिस्तानला जाणार नाही. सरकारने बीसीसीआयला आयसीसीच्या बैठकीमध्ये आपला युक्तिवाद जोरदारपणे मांडण्यास सांगितले आहे.
तसेच आयसीसीकडून पाकिस्तानमधील परिस्थिती आणि खेळाडूंच्या सुरक्षेबाबत आढावा मागण्यास सांगितले आहे. पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने चॅम्पियन्स ट्रॉफीचे आयोजन करण्यास नकार दिल्यास भारत या स्पर्धेसाठी तयार आहे. आयसीसीने भारताला यजमानपदाचे अधिकार दिल्यास त्याला सरकारकडून पूर्ण पाठिंबा मिळेल. एवढेच नाही तर चॅम्पियन्स ट्रॉफी खेळण्यासाठी भारतात येणाऱ्या संघांच्या खेळाडूंना व्हिसा मिळण्यात कोणतीही अडचण येणार नाही.
भारताने सर्व सामने लाहोरमध्ये खेळावेत आणि सामन्यानंतर खेळाडूंना भारतात पाठवण्याचा प्रस्ताव पीसीबीने ठेवला होता. भारताने याला नकार दिला, त्यानंतर पीसीबीने हायब्रिड मॉडेल स्वीकारण्यास नकार दिला. २००८ मध्ये मुंबईत झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर टीम इंडियाने पाकिस्तानला भेट दिलेली नाही. सुरक्षेच्या कारणास्तव आयसीसीने या काळात पाकिस्तानमध्ये आंतरराष्ट्रीय क्रिकेटवरही बंदी घातली होती.
पाकिस्तानने स्टेडियमचे नूतनीकरण केले आहे.
पाकिस्तान क्रिकेट बोर्ड चॅम्पियन्स ट्रॉफी २०२५ साठी जय्यत तयारी करत आहे. पीसीबीने तिन्ही स्टेडियमचे काम जवळपास पूर्ण केले आहे. त्यांनी लाहोर, कराची आणि रावळपिंडी स्टेडियमच्या नूतनीकरणावर जवळपास १२.५ अब्ज पाकिस्तानी रुपये खर्च केले आहेत. दरम्यान, भारत सरकारने आपला संघ पाकिस्तानला पाठवण्यास आधीच नकार दिला होता. बीसीसीआयने आयसीसीला सांगितले होते की, संघ पाकिस्तानमध्ये स्पर्धा खेळणार नाही. जर पाकिस्तानने हायब्रीड मॉडेलला सहमती दिली नाही तर ही स्पर्धा दुसऱ्या देशात हलवली जाऊ शकते. आयसीसीने चॅम्पियन्स ट्रॉफीसाठी भारतीय संघ पाकिस्तानला न पाठवण्याबाबत बीसीसीआयकडून लेखी उत्तर मागितले होते.
आयसीसीला उत्तर देण्यात आले असून आता पीसीबीने आयसीसीकडून भारताच्या उत्तराची लेखी प्रत मागितली आहे. दरम्यान, पाकिस्तानमध्ये सुरक्षेची कोणतीही समस्या नाही. त्यामुळे न्यूझीलंड, इंग्लंड आणि ऑस्ट्रेलियाच्या संघांनी येथे भेट दिली. जेव्हा हे संघ येऊ शकतात मग टीम इंडिया का नाही? असे पीसीबीच्या एका अधिकाऱ्याने प्रश्न केला होता.
आशिया कपमध्ये भारत पाकिस्तानला गेला नाही. गेल्या वर्षी सप्टेंबरमध्ये हायब्रीड मॉडेलचा अवलंब झाला होता. पाकिस्तानला आशिया कपमध्ये यजमानपदाची संधी मिळाली होती, पण भारताने पाकिस्तानला जाण्यास नकार दिला होता. त्यानंतर एसीसीने ही स्पर्धा हायब्रीड मॉडेलमध्ये आयोजित केली. भारताचे सर्व सामने श्रीलंकेत आणि बाकीचे सामने पाकिस्तानमध्ये झाले. पाकिस्तानचा सामना भारता विरुद्ध श्रीलंकेत झाला.
एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेसाठी पाकिस्तानचा संघ भारतात आला होता. त्यानंतर १४ ऑक्टोबरला अहमदाबादमध्ये भारत आणि पाकिस्तान यांच्यात सामना झाला. भारतीय संघाने हा सामना 7 विकेटने जिंकला. कर्णधार रोहित शर्मा आणि श्रेयस अय्यर यांनी अर्धशतके केली होती. जसप्रीत बुमराह सामनावीर ठरला. त्याने १९ धावांत २ बळी घेतले.
टीम इंडियाने शेवटचा पाकिस्तानला २००८ मध्ये भेट दिली होती: टीम इंडियाने शेवटची पाकिस्तानला २००८ मध्ये भेट दिली होती. ३ कसोटी सामन्यांची ती मालिका भारतीय संघाने १-० ने जिंकली होती. या मालिकेतील २ सामने अनिर्णित राहिले.
२०१३ मध्ये पाकिस्तान द्विपक्षीय मालिका खेळण्यासाठी भारतातही आला होता. पाकिस्तानने शेवटचा २०१२-१३ मध्ये भारताचा दौरा केला होता. त्या दौऱ्यात ३ एकदिवसीय आणि २ टी-२० सामन्यांची द्विपक्षीय मालिका खेळली गेली. पाकिस्तानने एकदिवसीय मालिका २-१ ने जिंकली, तर टी-२० मालिका १-१ अशी बरोबरीत राहिली.
२००८ मध्ये मुंबईवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यानंतर भारत सरकारने पाकिस्तानमध्ये क्रिकेट खेळण्यास नकार दिला होता. तेव्हापासून दोन्ही संघ फक्त आयसीसी आणि एसीसी स्पर्धांमध्ये खेळतात. २०१३ पासून, दोन्ही संघांनी तटस्थ ठिकाणी १३ एकदिवसीय आणि ८ टी-२० सामने खेळले आहेत. २००९ मध्ये पाकिस्तानमध्ये श्रीलंकेच्या संघावरही दहशतवादी हल्ला झाला होता.