अॅडलेड कसोटीपूर्वी ऑस्ट्रेलियाला मोठा धक्का
अॅडलेड : बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यात दारुण पराभवानंतर ऑस्ट्रेलिया संघाला आता अॅडलेड कसोटीपूर्वी आणखी एक धक्का बसला आहे. ऑस्ट्रेलियाचा वेगवान गोलंदाज जोश हेझलवूड ६ डिसेंबरपासून अॅडलेडमध्ये सुरू होणाऱ्या दुसऱ्या कसोटीतून बाहेर पडला आहे.
बॉर्डर-गावसकर ट्रॉफीतील पाच सामन्यांच्या मालिकेत ऑस्ट्रेलिया ०-१ ने पिछाडीवर आहे. अशावेळी आता दुखापतीमुळे वेगवान गोलंदाज जोश हेझलवुड अॅडलेट कसोटीला मुकणार आहे. क्रिकेट ऑस्ट्रेलियाने सांगितले की, हेझलवूडच्या जागी सीन अॅबॉट आणि ब्रेंडन डॉगेट यांचा संघात समावेश करण्यात आला आहे. हेजलवूडने पर्थ कसोटीत ५ विकेट घेतल्या होत्या. त्याने पहिल्या डावात ४ तर दुसऱ्या डावात १ गडी बाद केला हाेता.
बोलंड सराव सामन्यात खेळण्याची शक्यता
रविवारी सुरू होणाऱ्या दुसऱ्या सराव सामन्यात हेजलवूडच्या जागी स्कॉट बोलंडला संधी दिली जाऊ शकते. दोन दिवसीय सराव सामन्यादरम्यान बोलंड पीएम इव्हलनकडून खेळणार आहे. बोलंडने शेवटचा कसोटी सामना २०२३ च्या ऍशेस कसोटीत लीड्स येथे खेळला होता.
मार्शलाही दुखापत, खेळण्याबाबत शंका
ऑस्ट्रेलियन संघाचा अष्टपैलू खेळाडू मिचेल मार्शलाही दुखापत झाली आहे. त्याचे स्नायू ताणले गेले आहेत. मार्शच्या दुसऱ्या कसोटीत खेळण्याबाबत साशंकता आहे. त्याच्या जागी अष्टपैलू ब्यू वेबस्टरचा संघात समावेश करण्यात आला आहे. पर्थ कसोटीनंतर मार्शच्या स्नायूंना ताण आला होता. मार्शच्या दुखापतीवर ऑस्ट्रेलियाचे मुख्य प्रशिक्षक अँड्र्यू मॅकडोनाल्ड यांनीही मार्शच्या फिटनेसबाबत शंका व्यक्त केली आहे.