फेंगलच्या झंझावाताचा परिणाम. कृष्णगिरीत पुराच्या पाण्यात अनेक बस-गाड्या गेल्या वाहून. बचावकार्य सुरू
कृष्णगिरी (तामिळनाडू) : बंगालच्या उपसागरातून निर्माण झालेल्या फंगल वादळाच्या प्रभावामुळे केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्रमध्ये सोमवारी मुसळधार पाऊस पडत आहे. फेंगल चक्रीवादळ ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी ७:३० वाजता पुडुचेरीमधील कराईकल आणि तामिळनाडूमधील महाबलीपुरम दरम्यानच्या किनारपट्टीवर धडकले. हे वादळ आता केरळ, कर्नाटक, तेलंगणा आणि आंध्र प्रदेशात पोहोचले आहे.
तामिळनाडूतील तिरुवन्नमलाई येथे एका टेकडीवर भूस्खलन झाले. एनडीआरएफच्या म्हणण्यानुसार, सुमारे ४० टन वजनाचा खडक डोंगरावरून घरंगळत येत खाली कोसळला आणि व्हियूसी नगरमधील रस्त्यावरील घरांवर पडला,यामुळे २ घरे जमीनदोस्त झाली. खडकासोबत आलेल्या मातीच्या ढिगाऱ्याखाली राजकुमार, मीना, गौतम, इनिया, रम्या, विनोदिनी आणि महाही यांच्यासह ७ जण अडकल्याची भीती आहे. एनडीआरएफ हायड्रोलिक लिफ्टने खडक हटवण्याचा प्रयत्न करत आहे.
फेंगल वादळ रविवारी कमजोर झाले होते. त्याच्या प्रभावामुळे मुसळधार पावसामुळे ३ जणांचा मृत्यू झाला. पुद्दुचेरी जिल्ह्यात अवघ्या २४ तासांत ४९ सेमी पाऊस झाला आहे. या भागात गेल्या २० वर्षांत २४ तासांमध्ये पडलेला हा सर्वाधिक पाऊस आहे. शहरी भागात पाणी साचल्याने अनेक जण येथे अडकून पडल्याने लष्कराला पाचारण करण्यात आले. लष्कराने २०० लोकांना सुरक्षित स्थळी हलवले. तर एक हजार लोकांना मदत छावण्यांमध्ये हलवण्यात आले आहे.
आज कुठे जाणवणार फेंगलचा प्रभाव :
१) तेलंगणा: तेलंगणातील १० जिल्ह्यांमध्ये आज सोमवारी वादळ आणि पावसाची शक्यता व्यक्त करत यलो अलर्ट जारी करण्यात आला आहे. यापैकी जयशंकर भूपालपल्ली, मुलुगु, भद्राद्री कोठागुडेम, खम्मम, नलगोंडा, सूर्यपेठ, महबूबाबाद, वारंगल, हनामकोंडा आणि जनगाव येथे जोरदार वारे आणि मुसळधार पावसाची शक्यता आहे.
२) केरळ: ८ जिल्ह्यांमध्ये रेड अलर्ट: एर्नाकुलम, इडुक्की, थ्रिसूर आणि पलक्कडसाठी ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आला असून, अतिवृष्टीचा इशारा देण्यात आला आहे. पठाणमथिट्टा, अलप्पुझा आणि कोट्टायमसाठी मुसळधार पावसाचा पिवळा इशारा आहे. इडुक्कीने पावसामुळे कुमिली ते सबरीमाला या मुक्कुझी-सतराम जंगल मार्गावर यात्रेकरूंच्या हालचालींवर बंदी घातली आहे.
३) कर्नाटक: शाळा आणि महाविद्यालये बंद, थंडी वाढण्याची शक्यता - बंगळुरूमध्ये पाऊस अपेक्षित आहे. चामराजनगरमध्ये २ डिसेंबर रोजी परीक्षा असणारी पदवी महाविद्यालये वगळता शाळा व महाविद्यालये बंद ठेवण्याची घोषणा करण्यात आली आहे.
४) तामिळनाडू: ९ जिल्ह्यांतील शाळा आणि महाविद्यालये बंद - राज्यात आजही मुसळधार पाऊस पडत आहे. सालेम, धर्मपुरी, तिरुवन्नमलाई, तिरुपत्तूर, वेल्लोर आणि रानीपेट जिल्ह्यांमध्ये २ डिसेंबरला केवळ शाळांना सुट्टी जाहीर करण्यात आली आहे. कुड्डालोर, विल्लुपुरम आणि कृष्णगिरी येथील सर्व शाळा आणि महाविद्यालयांना सुट्टी आहे.
या वादळाचे नाव 'फेंगल' सौदी अरेबियाने सुचवले आहे. हा अरबी शब्द असून भाषिक परंपरा आणि सांस्कृतिक ओळख यांचे मिश्रण आहे. चक्रीवादळांची नावे निवडताना ही नावे उच्चारायला सोपी, लक्षात ठेवायला सोपी आणि सांस्कृतिकदृष्ट्या योग्य असल्याची खात्री केली जाते. विविध प्रांत आणि भाषांमध्ये वाद निर्माण होणार नाहीत किंवा कोणाचाही अपमान होणार नाही, अशी नावे असावीत, हे ध्यानात ठेवले जाते.