पणजी : धारगळ येथे सनबर्न आयोजणासंदर्भात एक मोठी अपडेट समोर आली आहे. आज पंचायत मंडळाची बैठक कडक पोलीस बंदोबस्तात पार पडली यावेळी धारगळ गावात येत्या २८ डिसेंबर रोजी आयोजित केल्या जाणाऱ्या सनबर्नविषयी चर्चा करण्यात आली. दरम्यान, या बैठकीत सनबर्न आयोजनाचा मार्ग मोकळा झाला. यंदा धारगळमध्येच सनबर्न संगीत महोत्सव होणार असून यास पंचायत मंडळातील ५ जणांनी समर्थन दिले तर ४ जणांनी महोत्सवाच्या आयोजनावर आक्षेप घेतला. दरम्यान गेल्या अनेक दिवसांपासून चर्चिला जाणारा हा मुद्दा आज एकदाचा तडीस लागला.
सनबर्न आयोजकांनी काही कागदपत्रे सादर केली असून त्यांच्या आधारे त्यांना तात्विक मान्यता देण्यात आली आहे. उर्वरित कागदपत्रे सादर केल्यानंतरच त्यांना ना हरकत दाखला देण्यात येईल असे पत्रकारांच्या एका प्रश्नास उत्तर देताना धारगळ पंचायतीचे संरपंच धुमाळ यांनी उत्तर दिले. दरम्यान पंचायत मंडळाने एखादी भूमिका घेतली म्हणजे ती काही गावाची भूमिका ठरत नाही असे एका ग्रामस्थाने म्हटले.
कालच्या बैठकीत काय घडले..
स्थानिक आमदार आणि विविध पंचायतींनी सनबर्नमुळे पेडण्याचा ऱ्हास होईल, पेडणे संस्कृतीकडून विकृतीकडे वळेल, गावातील संसाधनांची हानी होईल यासारखे विविध मुद्दे उपस्थित करून महोत्सवाच्या आयोजनास विरोध दर्शवला होता. तसेच सनबर्न लोकांना नको असेल तर आम्हाला पण नको. मला विश्वासात न घेता हा निर्णय सरकारने घेतला आहे. धारगळ पंचायत मंडळाने पेडणे तालुक्यातील जनतेच्या भावनेचा विचार करुन सनबर्नला परवानगी नाकारावी, असे आवाहन पेडणेचे आमदार प्रवीण आर्लेकर यांनी काल धारगळ पंचायतीच्या समोर म्हटले होते.
दरम्यान काल रविवारी, धारगळ पंचायत कार्यालय समोर व त्यानंतर धारगळ पंचायत क्षेत्रात सनबर्नविषयी दोन बैठका घेण्यात आल्या. यात सरपंच, पंच व काही स्थानिक लोकांनी या महोत्सवाच्या आयोजनाचे समर्थन करत गावाची आर्थिक बाजू भक्कम होईल आणि स्थानिक लोकांना रोजगार संधी मिळेल, असे सांगितले होते.
काही राजकीय नेते आपल्या स्वार्थासाठी लोकांना जमवून सनबर्नला विरोध करतात. मात्र याला धारगळ वासियांचा विरोध नाही. आज धारगळसारख्या गावात सनबर्न आल्यावर स्थानिकांना किंवा गावाला जर काही मदत होत असेल तर त्याला विरोध का? संस्कृतीच्या नावाने हे राजकीय लोक आपली पोळी भाजून घेण्यासाठी बाहेरील लोकांना घेऊन विरोध करतात.
धारगळ येथे कितीतरी प्रकल्प आले, त्याला स्थानिक आमदारांनी विरोध का केला नाही. येथील सिमेंट प्रकल्प बंद करणार असे बोलणाऱ्यांनी अद्याप हा प्रकल्प का बंद केला नाही, असा सवाल नागरिकांनी केला होता. यावेळी उपस्थितांनी या महोत्सवाला हात उंचावून पाठिंबा दर्शवला होता.