शिक्षण : एससीईआरटीतर्फे राज्य अभ्यासक्रम आरखड्यासंदर्भात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

Story: प्रतिनिधी | गोवन वार्ता |
4 hours ago
शिक्षण : एससीईआरटीतर्फे राज्य अभ्यासक्रम आरखड्यासंदर्भात राष्ट्रीय परिसंवादाचे आयोजन

पणजी : राज्य शैक्षणिक संशोधन आणि प्रशिक्षण परिषदेतर्फे (एससीईआरटी) ५ आणि ६ डिसेंबर रोजी राष्ट्रीय स्तरावरील परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे. चर्चासत्रात नवीन राज्य अभ्यासक्रम आराखड्यामार्फत 'राज्यातील शालेय शिक्षणात बदल' या विषयावर तज्ज्ञांमार्फत मार्गदर्शन केले जाणार आहे. एससीईआरटीच्या संचालक मेघना शेटगावकर यांनी दिली. सोमवारी पर्वरीत झालेल्या पत्रकार परिषदेत त्या बोलत होत्या. यावेळी शिक्षण संचालक शैलेश झिंगडे, सरीता मराठे, गोविंदराज देसाई आणि रुपेश सावंत आदी उपस्थित होते.

परिसंवादात राष्ट्रीय शिक्षण धोरणात (एनईपी) शिक्षकांची भूमिका,गोव्यातील कौशल्य शिक्षण, शिक्षण क्षेत्राचा भूतकाळ आणि भविष्य,  शाळा आणि शिक्षकांसाठी तंत्रज्ञान व डिजिटल शिक्षण, मूल्यांकनातील बदल, एनईपीतील मूलभूत साक्षरता आणि संख्याशास्त्र अशा विविध विषयांवर भाषणे होणार आहेत. परिसंवाद हे शिक्षक, शिक्षणतज्ञ, राज्य एनईपी समितीमधील सदस्यांसाठी असणार आहे. परिसंवादाचे उद्घाटन ५ डिसेंबर रोजी राजभवन येथे मुख्यमंत्री डॉ प्रमोद सावंत यांच्या हस्ते होणार असल्याचे शेटगावकर यांनी सांगितले.

उद्घाटन सत्राला केंद्रीय शिक्षण खात्याचे सचिव आनंदराव पाटील, राज्य सचिव प्रसाद लोलयेकर, एनसीईआरटीचे संचालक प्रा. दिनेश सकलानी व निपाच्या उपाध्यक्ष शशिकला वंजारी या उपस्थित राहणार आहेत. चर्चासत्रात रंजना अरोरा राष्ट्रीय अभ्यासक्रम आरखड्याविषयी मार्गदर्शन करतील. शशिकला वंजारी या एनईपीच्या अंमलबजावणीत शिक्षकांची भूमिका, प्रा. रमेश बाहू 'आयटप' या विषयावर मार्गदर्शन करणार आहेत. सर्व वक्त्यांना गोव्याला केंद्रस्थानी ठेऊन मार्गदर्शन करण्याची विनंती करण्यात आली आहे.  

परिसंवादाच्या दुसऱ्या दिवशी अनिल सहस्रबुद्धे, वसुधा कामत (ऑनलाईन), इंद्राणी भांडूरी, दीपक पालीवाल, अमरेंद्र बहेरा, विनय मेहेरोत्रा, डॉ. मधूश्री साउजी आणि डॉ. रामकृष्ण राव हे मार्गदर्शन करणार आहेत. कार्यक्रमाच्या समारोप सोहळ्याला जलस्त्रोत मंत्री सुभाष शिरोडकर उपस्थित राहणार आहेत. परिसंवाद केवळ निमंत्रितांसाठी असला तरी राज्यातील सर्व शिक्षकांना याचा लाभ घेता यावा यासाठी परिसंवादाचे लाईव्ह स्ट्रीमिंग केले जाणार असल्याचे शेटगावकर यांनी सांगितले.

अभ्यासक्रमात स्थानिक घटकांचा समावेश करणार 

"एनसीईआरटीकडून इयत्ता पहिली ते तिसरी आणि सहावीच्या अभ्यासक्रमाची पुस्तके आली आहेत. यामध्ये आम्ही स्थानिक घटकांचा समावेश करत आहोत. यासाठी एससीईआरटीच्या विविध विषय समित्यांचे काम सुरू झाले आहे. अभ्यासक्रमात गोवा संबंधित उपक्रम असावेत यासाठी आमचा प्रयत्न आहे." 

- मेघना शेटगावकर; संचालक, एससीईआरटी 

हेही वाचा