बार्देश : हणजूण वाहतूक पोलिसांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांशी केली गैरवर्तणूक

वाहतूक नियम भंग केल्याचा ठपका ठेवत मागितले तब्बल ३० हजार

Story: प्रतिनिधी । गोवन वार्ता |
3 hours ago
बार्देश : हणजूण वाहतूक पोलिसांनी चक्क आयपीएस अधिकाऱ्याच्या नातेवाईकांशी केली गैरवर्तणूक

म्हापसा : हडफडे येथे गोव्यात पर्यटनासाठी आलेल्या काही लोकांना वाहतूक नियम मोडल्याच्या नावाखाली हणजूण वाहतूक सेलच्या चार पोलीस कर्मचाऱ्यांनी अडवले.  यावेळी या पर्यटकांशी या पोलिसांनी गेरवर्तनही केले. दरम्यान हे पर्यटक राज्यातील एका आयपीएस अधिकाऱ्याचे नातेवाईक असल्याचे समोर आले असून, याप्रकरणी हणजूण वाहतुक पोलीस सेलचा एक सहाय्यक उपनिरीक्षक व तीन हवालदार अशा चार पोलिसांवर कारवाईचे निर्देश वरिष्ठ अधिकार्‍यांनी दिले आहेत. याबाबतचा आदेश आज संध्याकाळी जारी होण्याची शक्यता आहे.

 दरम्यान मिळालेल्या माहितीनुसार सदर घटना हडफडे येथे शनिवारी ३० नोव्हेंबर रोजी संध्याकाळी घडली होती. एका आयपीएस अधिकाऱ्याचे नातेवाईक तीन दुचाकींवरून कळंगुट व हणजूण भागात फिरत होते. येथे एका ठिकाणी उभे  असलेल्या वाहतूक सेलच्या पोलीस कर्मचाऱ्यांनी त्यांना अडवले व त्यांना वाहतूक नियम भंग केल्याप्रकरणी अवाढव्य असा तब्बल ३० हजारांचा दंड भरावा लागेल असे सांगितले. सरते शेवटी तासभर वाटाघाटी करत हे पोलीस ३ हजार रुपयांवर आले. दरम्यान सदर प्रकाराची माहिती मिळताच  त्यांच्याशी संपर्क साधलेल्या पोलीस अधिकाऱ्याशी देखील या पोलीस कर्मचाऱ्यांनी अरेरवीची भाषा वापरली. तसेच त्यांनी दिलेल्या सुचना देखील धुडकावून लावली.     

याचवेळी या पर्यटकांनी एकंदरीत घटनाक्रम आपल्या नातेवाईक असलेल्या आयपीएस अधिकाऱ्याचा कानावर घातला. त्यानुसार, सोमवारी २ डिसेंबर रोजी दुपारी, हणजूण वाहतूक सेलच्या त्या चारही पोलीस अधिकाऱ्यांना पोलीस मुख्यालयात पाचारण करण्यात आले. यावेळी वाहतूक पोलीस अधीक्षक, उपअधीक्षक आणि निरीक्षक यांची उपस्थिती होती. वाहतुकीच्या नियमाचा हवाला देत पर्यटकांची मानसिक व आर्थिक छळवणूक करणे हा प्रकार चुकीचाच आहे. अशा प्रकारांना खतपाणी मिळता कामा नये अशी सूचना करून सदर पोलीस कर्मचाऱ्यांवर कारवाईचा बडगा उगारण्यात यावा असे निर्देश एका वरिष्ठ अधिकाऱ्यांनी दिलेत. 

 वाहतुक कायद्याच्या नावाखाली पर्यटकांची लुबाडणूक करून त्यांची मानसिक व आर्थिक छळणूक करणे हा प्रकार गैर आहे. अशा प्रकारांना कोणत्याही परिस्थितीत पाठीशी घातले जाऊ नये, अशी सूचना करीत या पोलिसांवर कारवाई करण्याचे निर्देश वरीष्ठ अधिकार्‍यांनी  यावेळी दिले. त्यानुंसार संबंधितांवर कारवाईची प्रक्रिया वाहतुक पोलीस विभागाकडून सुरू करण्यात आली आहे. हल्लीच २९ नोव्हेंबर रोजी हणजूण वाहतुक पोलीस सेलमध्ये तैनात असलेल्या तिघा पोलीस कर्मचार्‍यांची  तडाफडकी बदली करत त्यांना वाहतूक प्रशिक्षण सेलमध्ये तैनात करण्यात आले होते. संबंधितांवर प़र्यटकांशी गैरवर्तणूक केल्याचा कथित आरोप होता.

या प्रकरणातील चार पैकी तिघेजण हडफडे येथील ठिकाणी ड्यूटी बजावत होते. पोलीस सेलमध्ये तसा उल्लेख आहे. तर अन्य एकजण तिथे स्वतःहून आला होता. त्यामुळे या हवालदाराची खात्यांर्गत वेगळी चौकशी करण्याचे निर्देशही वरिष्ठांनी दिले आहेत. नेहमीप्रमाणे ड्यूटी मास्तरला विश्वासात घेऊन हा पोलीस हवालदार सदर ठिकाणी आला होता, अशी चर्चा वाहतूक पोलिसांत सुरू आहे.


हेही वाचा