यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात गोव्याच्या जीएसटी संकलनात गेल्या वर्षीच्या नोव्हेंबरच्या तुलनेत तब्बल ११ टक्क्यांची वाढ दिसून आली
मुंबई : सरकारने नोव्हेंबर २०२४ मध्ये वस्तू आणि सेवा कर म्हणजेच जीएसटीमधून तब्बल १.८२ लाख कोटी रुपये गोळा केले आहेत. वार्षिक आकडेवारी लक्षात घेता ८.५ टक्क्यांची वाढ झाली आहे. रविवारी जाहीर झालेल्या आकडेवारीनुसार, वर्षभरापूर्वी म्हणजेच नोव्हेंबर २०२३ मध्ये सरकारने १.६८ लाख कोटी रुपयांचा जीएसटी जमा केला होता. या आर्थिक वर्षात म्हणजे २०२४-२५ मध्ये आतापर्यंत १४.५६ लाख कोटी रुपये जीएसटीमधून आले आहेत. तसेच या वर्षी नोव्हेंबरपर्यंत तब्बल १९.७४ लाख कोटी रुपयांचे संकलन करण्यात आले.
या वर्षी ऑक्टोबरमध्ये सरकारने जीएसटीमधून १.८७ लाख कोटी रुपयांचे संकलन केले होते, जे गेल्या वर्षीच्या ऑक्टोबरच्या तुलनेत ९ टक्के जास्त आहे. गेले सलग ९ महीने मासिक संकलन १.७ कोटी रुपयांचा टप्पा ओलांडत आहे. यंदा वर्षाच्या पहिल्या सत्रात जीएसटी संकलन १०.८७ कोटी होते. हा आकडा २०२४ या आर्थिक वर्षाच्या सहामाहीपेक्षा ९.५ टक्के जास्त होते.
नोव्हेंबर महिन्यात झालेले हे तिसरे सर्वात मोठे संकलन आहे. यापूर्वी एप्रिल २०२४ मध्ये जीएसटीच्या माध्यमाधून म्हणून सर्वाधिक २.१० लाख कोटी रुपयांचे संकलन झाले होते. त्याच वेळी, सरकारने एप्रिल-२०२३ आणि ऑक्टोबर-२०२४ मध्ये १.८७-१.८७ लाख कोटी रुपयांचा जीएसटी गोळा केला होता. सरकारने नोव्हेंबरमध्ये देशांतर्गत व्यवहारातून अधिक महसूल मिळवला आहे आणि परिणामस्वरूप जीएसटी संकलनात वाढ झाल्याचे दिसून आले आहे. केंद्रीय जीएसटी संकलन (CSGT) रुपये ३४,१४१ कोटी, राज्य जीएसटी संकलन (SGST) रुपये ४३,०४७ कोटी, इन्टीग्रेटेड जीएसटी (IGST) ९१,८२८ कोटी रुपये आणि उपकर संकलन १३,२५३ कोटी रुपये होते.
निव्वळ जीएसटी संकलन नोव्हेंबर महिन्यात ११ टक्क्यांनी वाढून १.६३ लाख कोटी रुपयांवर पोहोचले आहे. या महिन्यात १९,२५९ कोटी रुपयांचा परतावा जारी करण्यात आला. हा आकडा नोव्हेंबर २०२३ च्या तुलनेत ८.९ टक्क्यांनी कमी आहे. रिफंड अॅडजस्ट केल्यानंतर, निव्वळ जीएसटी संकलन ११ टक्क्यांनी वाढून १.६३ लाख कोटी रुपये झाले आहे.
यंदाच्या नोव्हेंबर महिन्यात गोव्याच्या जीएसटी संकलनात तब्बल ११ टक्क्यांची वाढ दिसून आली. म्हणजेच राज्याला तब्बल ५६० कोटी रुपयांचा महसूल हा कराच्या स्वरूपात प्राप्त झाला. दरम्यान गेल्यावर्षी नोव्हेंबरमध्ये राज्याला ५०३ कोटी रुपयांचा महसूल प्राप्त झाला होता.