झारखंड : चार एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारला झुकते माप ; दोनमध्ये 'इंडि आघाडी' वरचढ

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
झारखंड : चार एजन्सींच्या एक्झिट पोलमध्ये एनडीए सरकारला झुकते माप ; दोनमध्ये 'इंडि आघाडी' वरचढ

रांची :  झारखंडमध्ये ८१ सदस्यीय विधानसभेसाठीचे मतदान काल सायंकाळी संपल्यानंतर सहा एजन्सींनी एक्झिट पोलच्या माध्यमातून आपले अंदाज बांधले आहेत. यामध्ये झारखंडात त्रिशंकू स्थितीची शक्यता वर्तवण्यात आली असून काहींच्या अंदाजाप्रमाणे एनडीएचे सरकार सत्तेत येऊ शकते. मॅट्रिस, चाणक्य, पीपल्स पल्स आणि टाईम्स नाऊच्या पोलनुसार राज्यात भाजप-एनडीएचे बहुमत सरकार बनण्याचा अंदाज आहे. 

त्याच वेळी, ॲक्सिस माय इंडिया आणि पी मार्कच्या एक्झिट पोलनुसार, राज्यात पुन्हा  इंडि आघाडी सरकार स्थापन करू शकते. झारखंड राज्य विधानसभेत बहुमताचा आकडा ४१  आहे. ॲक्सिस माय इंडियाच्या एक्झिट पोलमध्ये जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीला ५३ आणि एनडीएला २५ जागा मिळण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे. इतरांना ३  जागा मिळू शकतात.

टाईम्स नाऊ जेविसीच्या एक्झिट पोलने एनडीए सरकार स्थापन करेल असे संकेत दिलेत. या पोलनुसार भाजप प्रणित एनडीएला ४० ते ४४ जागा मिळतील, तर इंडि आघाडीला ३० ते ४० जागा मिळतील असा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. दोन जागा या अपक्षांच्या खात्यात जातील, असा अंदाज आहे. चाणक्य एक्झिट पोलनुसार झारखंडमध्ये एनडीएला ४५ ते ५० जागा मिळू शकतात, तर इंडि आघाडीला ३५ ते ३८ जागा मिळण्याची शक्यता आहे. इतरांच्या खात्यांमध्ये ३ ते ५ जागा जातील असा अंदाज आहे. पीपल्स पल्सनुसार झारखंडमध्ये एनडीएला ४४-५३ जागा आणि इंडि आघाडीला २५-३७ जागा मिळू शकतात. इतरांना ५  ते ९ जागा मिळतील असा अंदाज आहे.

मॅट्रिझच्या एक्झिट पोलमध्ये झारखंडमध्ये भाजपच्या नेतृत्वाखालील एनडीएला ४२ ते ४७ जागा मिळू शकतात, तर जेएमएम-काँग्रेस-आरजेडी आघाडीला २५ ते ३० जागा मिळू शकतात. इतरांना १  ते ४ जागा मिळण्याची शक्यता आहे. पी-मार्क एक्झिट पोलच्या अंदाजानुसार, झारखंडमध्ये इंडि आघाडीला पूर्ण बहुमत मिळत असल्याचे दिसत आहे. या पोलमध्ये त्यांना ३७ ते ४७ जागा मिळतील, तर भाजप प्रणीत एनडीएला ३१ ते ४० जागा मिळतील असा अंदाज आहे. झारखंडमधील ८१ जागांसाठी १३  आणि २० नोव्हेंबरला दोन टप्प्यात मतदान पार पडले. २३ नोव्हेंबरला मतमोजणी होणार आहे.

हेही वाचा