जम्मू काश्मीर : पाकिस्तानी दहशतवाद्यांची खोऱ्यात घुसखोरी; एनआयएची ८ जिल्ह्यांत छापेमारी सुरू

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
2 hours ago
जम्मू काश्मीर : पाकिस्तानी दहशतवाद्यांची खोऱ्यात घुसखोरी; एनआयएची ८ जिल्ह्यांत छापेमारी सुरू

श्रीनगर : राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) गुरुवारी सकाळी जम्मूच्या अनेक भागात छापे टाकले. पोलीस  आणि निमलष्करी दल सीआरपीएफच्या मदतीने एनआयएचे अधिकारी तब्बल आठ जिल्ह्यांत अनेक ठिकाणी छापे टाकत असल्याची माहिती समोर आली आहे . पाकिस्तानातून दहशतवाद्यांची घुसखोरी झाल्याच्या गोपनीय माहितीच्या आधारे ही कारवाई सुरू आहे. 

 गेल्या काही दिवसांत खोऱ्यात अनेक दहशतवादी घटना घडल्या आहेत. त्यानंतर दहशतवाद्यांविरोधात सुरक्षा दलांची कारवाईही तीव्र झाली आहे. एनआयएच्या या कारवाईला दहशतवाद्यांविरोधातील मोठी कारवाई म्हणून पाहिले जात आहे. यापूर्वी, एनआयएने ५  ऑक्टोबर रोजी दहशतवादी कट आणि दहशतवादी फंडिंगच्या संशयावरून ५ राज्यांमध्ये २२ ठिकाणी एकाच वेळी छापे टाकले होते. ५ ऑक्टोबर रोजी एनआयएच्या वतीने महाराष्ट्र, जम्मू-काश्मीर, उत्तर प्रदेश, आसाम आणि दिल्ली येथे छापे टाकण्यात आले होते.

जैश-ए-मोहम्मद या दहशतवादी संघटनेच्या संबंधात ही कारवाई करण्यात आली. एनआयएने जम्मू-काश्मीरमधील बारामुल्ला आणि इतर भागातही छापे टाकले. मौलवी इक्बाल भटच्या बारामुल्ला येथील घराची एनआयएने सुरक्षा दलांच्या मदतीने झडती घेतली. एनआयएच्या या कारवाईपूर्वी १  ऑक्टोबर रोजी पश्चिम बंगालमधील अनेक जिल्ह्यांमध्ये छापे टाकण्यात आले होते. १  ऑक्टोबर रोजी एनआयएच्या पथकाने दक्षिण २४ परगणा, आसनसोल, हावडा, नादिया आणि कोलकाता येथील ११  ठिकाणी छापे टाकले.


हेही वाचा