जॉर्जटाउन : गयानाचे अध्यक्ष डॉ. मोहम्मद इरफान अली यांनी भारताचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना देशातील सर्वोच्च नागरी सन्मान 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स' देऊन सन्मानित केले. गयानाच्या सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्काराने सन्मानित होणारे पंतप्रधान नरेंद्र मोदी हे चौथे परदेशी नेते आहेत. भारतीय परराष्ट्र मंत्रालयाचे प्रवक्ते रणधीर जैस्वाल यांनी एका पोस्टच्या माध्यमातून 'गयाना आणि भारताचे राजनैतिक संबंध अधिक दृढ करण्यासाठी दिलेल्या योगदानाबद्दल पंतप्रधान मोदींना देशाचा सर्वोच्च राष्ट्रीय पुरस्कार 'द ऑर्डर ऑफ एक्सलन्स' प्रदान करण्यात आला.' असे म्हटले आहे.
'तंत्रज्ञान, नवनिर्मिती आणि डिजिटलायझेशनचा वापर देशांमधील अंतर वाढवण्यासाठी करू नये. या प्रगतीचा उपयोग अंतर आणि गरिबी कमी करण्यासाठी आणि जगाला जवळ आणण्यासाठी केला पाहिजे. भारत नेमके तेच करत आहे' असे गयानाचे
अध्यक्ष इरफान म्हणाले. तर पंतप्रधान मोदी यांनी 'ऑर्डर ऑफ एक्सलन्स'ने सन्मानीत केल्याबद्दल पंतप्रधान त्यांचे आभार मानले. ' हा सन्मान केवळ माझाच नाही तर भारतातील १४० कोटी लोकांचा सन्मान आहे.' असे मोदी म्हणाले. द्विपक्षीय संबंधांना अभूतपूर्व उंचीवर नेण्यात राष्ट्रपती इरफान अली यांचे मोठे योगदान आहे. आजच्या चर्चेत मला भारतातील लोकांबद्दलची असलेली त्यांची आपुलकी भावली. भारतही गयानाच्या खांद्याला खांदा लावून प्रत्येक क्षेत्रात उभा आहे.
ज्याप्रमाणे गयानाच्या नद्या इथल्या लोकांच्या सांस्कृतिक अस्मितेचा एक भाग आहेत, त्याचप्रमाणे गंगा, यमुना आणि ब्रह्मपुत्रा या भारतातील महान नद्या देखील आपल्या प्राचीन संस्कृतीची जन्मभूमी आहेत. भारत आणि गयाना यांच्यातील समानतेची अनेक उदाहरणे आहेत जी आमचे ऐतिहासिक संबंध अधिक दृढ करतात.' असे पंतप्रधान मोदी म्हणाले.