झारखंड : गोरहर-हजारीबाग येथे प्रवासी बस उलटली, सात जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
4 hours ago
झारखंड : गोरहर-हजारीबाग येथे प्रवासी बस उलटली, सात जणांचा मृत्यू, २५ हून अधिक जखमी

रांची : झारखंडमधील हजारीबाग जिल्ह्यातील गोरहर पोलीस स्थानकाच्या हद्दीत गुरुवारी सकाळी एक प्रवासी बस नियंत्रणाबाहेर जाऊन उलटली. या अपघातात सात जणांचा मृत्यू झाला असून २५ हून अधिक जण जखमी झाल्याची माहिती आहे. मृतांच्या संख्येची अधिकृत पुष्टी सध्या झालेली नाही. 

 सर्व जखमींना उपचारासाठी जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. मिळालेल्या माहितीनुसार, बस कोलकाताहून पाटण्याला जात होती. सकाळी ६:३० च्या सुमारास चालकाचे बसवरील नियंत्रण सुटून उलटली. बहुतांश प्रवासी झोपले होते. अपघातानंतर आरडाओरडा झाला. आजूबाजूचे लोक घटनास्थळी पोहोचले आणि त्यानंतर पोलिसांना माहिती देण्यात आली. अपघातग्रस्त बसच्या खिडक्या तोडून प्रवाशांना बाहेर काढण्यात आले. या अपघातात तिघांचा जागीच मृत्यू झाला, तर चौघांचा रुग्णालयात नेत असताना मृत्यू झाला. जीटी रोडवर सहापदरी रस्त्याचे बांधकाम सुरू असून एका ठिकाणी खड्डे दिसल्याने लेन बदलताना चालकाचे बसवरील नियंत्रण सुटले आणि बस उलटली, असे प्रत्यक्षदर्शींचे म्हणणे आहे. 

सहा पदरी रस्त्याच्या कामाची गती अतिशय संथ असल्याचे नागरिकांचे म्हणणे आहे. गोरहर ते चौपारणपर्यंत अनेक ठिकाणी अनेक महिन्यांपासून सुरू असलेले खांबांचे बांधकाम अपूर्ण आहे. अनेक ठिकाणी खड्डे खोदण्यात आले आहेत. त्यामुळे या रस्त्यावर सातत्याने अपघात होत आहेत. अपघाताची माहिती मिळताच डीएसपी अजितकुमार विमल, गोरहर पोलीस स्थानकाचे प्रभारी, बरकाठा पोलीस स्थानकाचे प्रभारी आणि बचावकार्य करणारे पथक घटनास्थळी पोहोचले. सध्या मदत आणि बचावकार्य सुरू आहे. 


हेही वाचा