दिल्ली : आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची भारताच्या 'कॅग'पदी नियुक्ती

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
20th November, 12:03 pm
दिल्ली : आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची भारताच्या 'कॅग'पदी नियुक्ती

नवी दिल्ली : केंद्र सरकारने वरिष्ठ आयएएस अधिकारी के. संजय मूर्ती यांची भारताचे नवे नियंत्रक आणि महालेखापरीक्षक (CAG) म्हणून नियुक्ती केली आहे. १८ नोव्हेंबर रोजी अर्थ मंत्रालयाने एक अधिसूचना जारी करून ही माहिती दिली. के. संजय मूर्ती सध्या शिक्षण मंत्रालयाच्या अंतर्गत उच्च शिक्षण विभागात सचिवपदी कार्यरत आहेत. 

ते भारताचे वर्तमान कॅग गिरीश चंद्र मुर्मू यांची जागा घेतील. मुर्मू यांचा कार्यकाळ आज २० नोव्हेंबर रोजी संपत आहे. ऑगस्ट २०२० मध्ये मुर्मू यांची नियंत्रक आणि महालेखापरीक्षक म्हणून नियुक्ती करण्यात आली होती. यापूर्वी मुर्मू यांनी जम्मू-काश्मीरचे पहिले नायब राज्यपाल म्हणून काम  पहिले होते. 

के.  संजय मूर्ती हे मूळचे आंध्र प्रदेशचे आहेत. त्यांनी हिमाचलमध्ये १३ वर्षे सेवा दिली. त्यांनी हिमाचलमधील शिक्षण सचिव, वाहतूक, नागरी विकास विभाग, विद्युत महामंडळ, पर्यावरण विज्ञान आणि तंत्रज्ञान यासारखे इतर विभागांची धुरा संभाळली. 

भारतीय राज्यघटनेच्या कलम १४८ मध्ये 'कॅग'साठी तरतूद आहे. केंद्र आणि राज्य सरकारे आणि त्यांच्याद्वारे नियंत्रित संस्थांच्या उत्पन्न आणि खर्चाची चौकशी कॅग  म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाद्वारे केली जाते. ही संस्था जनतेच्या पैशांचा अपव्यय झाल्याच्या प्रकरणांची वेळोवेळी माहिती देते. कॅग म्हणजेच नियंत्रक आणि महालेखापरीक्षकाची नियुक्ती राष्ट्रपती करतात. कॅगचा कार्यकाळ ६ वर्षांचा असतो, त्यापूर्वी जर त्याने वयाची ६५ वर्षे पूर्ण केली तर तो निवृत्त होतो.


हेही वाचा