अमायरा, मोहम्मद, अद्वैत, शिवांजली, शाहीनला बॅडमिंटनमध्ये दुहेरी किताब

राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धा : राज्यातील विविध भागांतून खेळाडूंची उपस्थिती

Story: क्रीडा प्रतिनिधी। गोवन वार्ता |
15th November, 11:16 pm
अमायरा, मोहम्मद, अद्वैत, शिवांजली, शाहीनला बॅडमिंटनमध्ये दुहेरी किताब

पणजी : राज्य मानांकन बॅडमिंटन स्पर्धेत अमायरा धुमटकर, मोहम्मद उमर, अद्वैत बाळकृष्णन, शिवांजली थिटे व शाहीन सी. के. यांनी दुहेरी किताब पटकावला. स्पर्धा सनलाईट स्पोर्ट्स अँड कल्चरल क्लब व अशोक वाळके चॅरिटेबल ट्रस्टने गोवा बॅडमिंटन असोसिएशन आ​​णि गोवा क्रीडा प्राधिकरणाच्या सहकार्याने कांपाल-पणजी येथे आयोजन केले होते.


११ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत मायकेल रायन मारेने प्रतिक नाईक बोरकरवर २१-९, २१-९ असा विजय मिळवत वर्चस्व राखले. अमायरा धुमटकरने ११ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत कनिका पै वेर्णेकरवर २१-११, २१-१६ अशी मात करत विजेतेपद पटकावले.

११ वर्षांखालील मुलांच्या दुहेरीत प्रतीक नाईक बोरकर आणि वरुण सहकारी यांनी अरहा सहकारी आणि वेध लोटलीकर या जोडीवर २१-१६, ११-२१, २१-१९ असा रोमहर्षक तीन सेटमध्ये मात केली. अमायरा धुमटकर हिने अशबाह तहसिलदार सोबत ११ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत अदिती धारगळकर आणि कनिका पै वेर्णेकर यांचा २१-१०, २१-१५ असा पराभव करून विजेतेपद पटकावले.

१३ वर्षांखालील गटात मोहम्मद उमर शेखने मायकेल रायन मारेचा २१-१३, २१-१२ असा पराभव करून मुलांच्या एकेरीचे विजेतेपद पटकावले. १३ वर्षांखालील मुलींच्या एकेरीत निहारिका परवारने प्रज्ञा औदीवर १३-२१, २१-१६, २१-१९ अशा तीन सेटमध्ये मात करत विजय मिळवला. मोहम्मद उमर शेख, विरादित्य पै काणे सोबत जोडी बनवून १३ वर्षांखालील मुलांचे दुहेरीचे विजेतेपद समर्थ साखळकर आणि विश्व परब यांना २१-१६, २१-३ असे नमवत जिंकले. आस्था पौडेल आणि प्रज्ञा औदी यांनी अवनी ख्यालिया आणि पलक रामनाथकर यांचा २१-१६, २१-१७ असा पराभव करून १३ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरी बालकृष्णन विजयी

१७ वर्षांखालील मुलांच्या एकेरीच्या अंतिम फेरीत अद्वैत बालकृष्णनने रुतव कनाबरवर २१-१८, २१-१५ असा विजय मिळवला. शिवांजली थिटेने १७ वर्षांखालील मुलींच्या एकेरीच्या किताबासाठी सुफिया शेखविरुद्ध २०-२२, २१-१९, २१-१७ असा संघर्षपूर्ण सामना जिंकला. अद्वैत बालकृष्णनच्या जोडीने शाहीन सीके हिने अॅलोइसियस रॉड्रिग्ज आणि सानंद नायर यांचा २१-९, २१-१७ असा पराभव करत १७ वर्षांखालील मुलांचे दुहेरीचे विजेतेपद पटकावले.

१७ वर्षांखालील मुलींच्या दुहेरीत शिवांजली थिटे आणि सुफिया शेख यांनी मिनोष्का परेरा आणि सानवी औदी यांचा २१-१५, २१-१८ असा पराभव केला. शेवटी १७ वर्षांखालील मिश्र दुहेरीचे विजेतेपद शाहीन सी के आणि आरोही कवठणकर यांच्याकडे गेले. त्यांनी अद्वैत बालकृष्णन आणि सुफिया शेख यांचा ११-२१, २१-१९, २१-१६ असा तीन सेटमध्ये पराभव केला.

अशोक वाळके चॅरिटेबल ट्रस्टचे संस्थापक डॉ. अमोल वाळके यांच्यासह विश्वस्त सतीश शिरोडकर आणि श्रीकांत शिरोडकर, जीबीएचे अध्यक्ष मनोज पाटील, सचिव प्रवीण शेणॉय आणि आयोजक क्लबचे सदस्य रूपचंद्र हुमरसकर (अध्यक्ष), अर्नाल्डो रॉड्रिग्स (सचिव), भूषण वेर्णेकर (खजिनदार) आणि टूर्नामेंट डायरेक्टर मरिना अल्बुकर्क यांनी अंतिम सामन्यांना उपस्थिती लावली.