भारतीय महिला हॉकी संघाचा विजयी धडाका कायम

थायलंडला १३-० ने लोळवले : दीपिका कुमारीचे ५ गोल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
14th November, 11:53 pm
भारतीय महिला हॉकी संघाचा विजयी धडाका कायम

राजगीर : महिला हॉकी आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये भारताने सलग तिसरा विजय संपादन केला. भारतीय महिला हॉकी संघाने १४ रोजी बिहारमधील राजगीर येथे थायलंडचा १३-० असा धुव्वा उडवला. भारताकडून दीपिका कुमारीने ५ गोल केले. तिला सामनावीर म्हणून गौरवण्यात आले.
मूळची हरियाणाची असलेल्या दीपिकाने थायलंडविरुद्ध भारताचे खाते उघडले.दक्षिण कोरियाविरुद्धच्या गेल्या सामन्यातही दीपिकाने भारताचे खाते उघडले होते. तिच्याशिवाय लालरेमसियामी देवी, प्रीती दुबे आणि मनीषा चौहान यांनी भारताकडून प्रत्येकी २ गोल केले. भारताने या स्पर्धेतील तिन्ही सामने जिंकले असले तरी चीनच्या तुलनेत गोल फरकात पिछाडीवर आहे. भारताचा गोल फरक ५ वरून १४ झाला आहे.चीननेही आतापर्यंतचे तिन्ही सामने जिंकले आहेत. १४ नोव्हेंबर रोजी झालेल्या तिसऱ्या सामन्यात चीनने जपानचा २-१ असा पराभव केला. भारताच्या तुलनेत चीनचा गोल फरकही खूप जास्त आहे. १२ नोव्हेंबरपर्यंत चीनचा गोल फरक २० होता, जो आता वाढून २१ झाला आहे. यामुळेच आशियाई महिला हॉकी चॅम्पियन्स ट्रॉफीच्या पॉइंट टेबलमध्ये चीन अव्वल स्थानावर कायम आहे.भारतीय संघ कमकुवत थायलंडविरुद्ध मोठा विजय नोंदवू शकतो आणि चीन आणि जपानविरुद्धच्या दोन अंतिम फेरीच्या सामन्यांपूर्वी आपले स्थान मजबूत करू शकतो. मलेशियाने आतापर्यंत ३ पैकी १ सामना जिंकला आहे. भारताने आता उपांत्य फेरी गाठली आहे, तर अजून २ सामने खेळायचे आहेत. आता भारताचा पुढील सामना १६ रोजी चीनशी होणार आहे. तो सामनाही भारतीय वेळेनुसार संध्याकाळी ४.४५ वाजता सुरू होईल. भारत विरुद्ध थायलंड सामन्यापूर्वी मलेशियाने दक्षिण कोरियाचा २-१ असा पराभव केला. त्याआधी चीनने दिवसाच्या पहिल्या सामन्यात जपानचा पराभव केला होता.