फिफा विश्वचषक पात्रता फेरीत पॅराग्वेने बलाढ्य अर्जेंटिनाचा केला पराभव

जाणून घ्या कसा झाला सामना...

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
15th November, 12:21 pm
फिफा विश्वचषक पात्रता फेरीत पॅराग्वेने बलाढ्य अर्जेंटिनाचा केला पराभव

ब्यूनस आयर्स : फिफा विश्वचषक पात्रता फेरीत पॅराग्वेने बलाढ्य अर्जेंटिनाचा २-१ असा पराभव करून खळबळ उडवून ​दिली. अँटोनियो सनाब्रिया आणि ओमर अल्देरेटे यांनी पराग्वे संघासाठी गोल केले.

इंटर मिलानचा स्ट्रायकर लॉटारो मार्टिनेझने सामन्यातील पहिला गोल करत अर्जेंटिनासाठी खाते उघडले.त्याने एन्झो फर्नांडिसच्या शानदार पासवर धाव घेत चेंडूवर ताबा मिळवला आणि दूरच्या कोपऱ्यावरून अचूक शॉट मारला.काही क्षणांनंतर, गुस्तावो वेलास्क्वेझच्या क्रॉसवर सनाब्रियाने उत्कृष्ट ओव्हरहेड व्हॉलीसह पॅराग्वेसाठी बरोबरी साधली. हाफ टाईमनंतर काही वेळातच डिएगो गोमेझच्या फ्री-किकवर अल्देरेटेने हेडरसह पॅराग्वेला आघाडी मिळवून दिली. अर्जेंटिनाचा संघ त्यानंतर एकही गोल करण्यात यशस्वी होऊ शकला नाही आणि त्यांना हा सामना १-२ असा गमवावा लागला.तथापि, पराभवानंतरही, अर्जेंटिना १० संघांच्या दक्षिण अमेरिकन झोनमध्ये ११ सामन्यांतून २२ गुणांसह अव्वल स्थानावर आहे, पॅराग्वे अर्जेंटिनापेक्षा सहा गुणांनी मागे आहे. या गटातील अव्वल ६ संघ २०२६ च्या विश्वचषकासाठी थेट पात्र ठरतील, तर सातव्या स्थानावर असलेल्या संघाला आंतरखंडीय प्लेऑफमध्ये संधी मिळेल २०२६ फिफा विश्वचषक उत्तर अमेरिकन देश कॅनडा, मेक्सिको आणि यूएसए मध्ये होणार आहे .