टी २० रँ​किंगमध्ये तिलक वर्माची जोरदार मुसंडी

क्रमवारीत ६९ स्थानांनी झेप घेत थेट टॉप ३ मध्ये मिळवले स्थान : अष्टपैलूमध्ये हार्दिक पांड्या अव्वल

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
12 hours ago
टी २० रँ​किंगमध्ये तिलक वर्माची जोरदार मुसंडी

दुबई : आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेने पुरुष टी-२० क्रिकेटची क्रमवारी जाहीर केली आहे. या नव्या क्रमवारीत भारतीय खेळाडूंची ताकद दिसून आली आहे.
भारतीय क्रिकेट संघाचा स्टार अष्टपैलू खेळाडू हार्दिक पांड्याने २०२४ मध्ये आणखी एक मोठी कामगिरी केली आहे. त्याने आयसीसी पुरुषांच्या टी २० अष्टपैलू क्रमवारीत पहिले स्थान मिळवले आहे. तसेच भारतीय संघाचे युवा फलंदाज तिलक वर्मा आणि संजू सॅमसन यांनीही फलंदाजी क्रमवारीत मोठी नव्हे तर गरूडझेप घेतली आहे.
भारताचा युवा आणि स्फोटक फलंदाज तिलक वर्मा याने दक्षिण आफ्रिकेविरुद्धच्या तिसऱ्या आणि चौथ्या टी २० सामन्यात सलग २ शतके झळकावली. तिलक वर्मा याने यासह संजू सॅमसन याच्या सलग २ टी-२० शतकांच्या विक्रमाची बरोबर केली होती. एकूण २८० धावा करून तो या मालिकेत सर्वाधिक धावा करणारा खेळाडू ठरला होता. तिलकला या कामगिरीचा जबरदस्त फायदा झाला आहे. आयसीसीने जाहीर केलेल्या टी-२० क्रमवारीत तिलक वर्माने मोठी झेप घेतली आहे. तिलकला या २ शतकांमुळे थोडा-थोडका नव्हे तर तब्बल ६९ स्थांनाचा फायदा झाला आहे.
तिलक वर्मा याआधी क्रमवारीमध्ये ७२ व्या स्थानी होता. मात्र त्याला २ शतकांमुळे जबरदस्त फायदा मिळाला आहे. तिलक ७२ व्या क्रमांकावरुन थेट तिसऱ्या स्थानी येऊन पोहचला आहे. या क्रमवारीत ऑस्ट्रेलियाचा ट्रॅव्हिस हेड हा ८५५ रेटिंगसह पहिल्या तर इंग्लंडचा फिल सॉल्ट ८२८ रेटिंगसह दुसऱ्या स्थानावर आहे.
तिलकने कर्णधार सूर्यकुमार यादव याला मागे टाकले आहे. तिलकची रेटिंग ८०६ तर सूर्याची ७८८ रेटिंगसह चौथ्या स्थानी आहे. तिलकने यासह टीम इंडियाचा कर्णधार सूर्यकुमार यादव, यशस्वी जैस्वाल, ऋतुराज गायकवाड, शुभमन गिल, संजू सॅमसन, रिंकू सिंग, हार्दिक पांड्या यासारख्या फलंदाजांना मागे टाकलं आहे.
सॅमसनचीही मोठी झेप
भारताचा यष्टीरक्षक फलंदाज संजू सॅमसननेही दक्षिण आफ्रिकेविरुद्ध दोन सामन्यात शतक झळकावले होते तसेच तो दोनदा शून्यावरही बाद झाला होता. त्यानेदेखील १७ स्थानांची झेप घेतली आहे. आता तो टी-२० फलंदाजी क्रमवारीत २२ व्या स्थानावर पोहचला आहे. याव्यतिरिक्त भारताचा युवा खेळाडू यशस्वी जैस्वाल ७०६ गुणांसह ८व्या तर ऋतूराज गायकवाड ६१९ रेटिंगसह १५ व्या क्रमाकांवर आहे.