पणजी : गोव्याच्या समृद्धी पाटीलने ६८व्या शालेय राष्ट्रीय तायक्वांदो चॅम्पियनशिपमध्ये शानदार प्रदर्शन करताना ५२ किलो वजनी गटात सुवर्णपदक पटकावले. स्पर्धा विदीशा, मध्य प्रदेश येथे आयोजित करण्यात आली होती.
समृद्धीने तिच्या प्रभावी खेळात सर्व बाऊट्स ३-2 च्या स्कोअरलाइनने जिंकले. तिने गुजरातमधील प्रतिस्पर्ध्याविरुद्धची पहिली लढत जिंकली, त्यानंतर पश्चिम बंगालच्या खेळाडूवर विजय मिळवला आणि तिसऱ्या लढतीत महाराष्ट्राच्या खेळाडूला पराभूत केले. उपांत्य फेरीत समृद्धीने उत्तराखंडच्या खेळाडूला पराभूत केल्यानंतर अंतिम फेरीत मणिपुरी प्रतिस्पर्ध्याचा पराभव केला.
समृद्धीने सुवर्ण पटकावले तर मणिपूरच्या स्पर्धकाने रौप्य व उत्तराखंड आणि महाराष्ट्राच्या स्पर्धकांमध्ये कांस्यपदक विभागून देण्यात आले. समृद्धीचे राष्ट्रीय स्तरावरील यश हे विजय मोकाशी, देवेंद्र कुमार लमाणी, किशन महाले आणि शिवाजी पाटील तसेच व्यवस्थापक दिनेश्वर देसाई यांच्या पाठिंब्यामुळे मिळाले. समृद्धीचे क्रीडा व युवा व्यवहार संचालक अरविंद खुटीकर यांच्याकडून तिच्या उत्कृष्ट कामगिरीबद्दल अभिनंदन करण्यात आले.