अरुणाचल प्रदेशचा ८४ धावांत खुर्दा

अर्जुनचे ५ बळी : कश्यप बाकलेच्या १७९, तर स्नेहल कवठणकरच्या १४६ धावा

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
21 hours ago
अरुणाचल प्रदेशचा ८४ धावांत खुर्दा

पर्वरी : रणजी ट्रॉफी २०२४ ची पाचवी फेरी बुधवारपासून (१३ नोव्हेंबर) सुरू झाली. सध्या पर्वरी येथील जीसीएच्या मैदानात गोव्याचा सामना अरुणाचल प्रदेशशी होत असून या सामन्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरचा मुलगा अर्जुन तेंडुलकरची कामगिरी चर्चेचा विषय ठरली आहे. या सामन्यात अर्जुने ५ गडी बाद करत अरुणाचल प्रदेशचे कंबरडे मोडले, तर फलंदाजी करताना कश्यप बाकलेच्या १७९ तर स्नेहल कवठणकरच्या १४६ धावांच्या जोरावर गोव्याने दिवसअखेर २ बाद ४१४ धावा केल्या.
अर्जुनने अरुणाचल प्रदेशविरुद्ध कारकिर्दीत पहिल्यांदाच पाच विकेट घेत विरोधी संघाला १०० धावाही करू दिल्या नाहीत. अरुणाचल प्रदेशकडून केवळ ४ फलंदाज दुहेरी धावांचा आकडा धावा गाठू शकले. त्यापैकी सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजाने २५ धावा केल्या. अरुणाचल प्रदेशचा संपूर्ण संघ ३०.३ षटकात केवळ ८४ धावा करून गडगडला.
या सामन्यात अरुणाचल प्रदेशने नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी करण्याचा निर्णय घेतला होता. मात्र हा निर्णय अर्जुन तेंडुलकरने आपल्या घातक गोलंदाजीने पूर्णपणे चुकीचा सिद्ध केला. त्याने नबाम हाचांग (०), नीलम ओबी (२६), जय भावसार (०), चिन्मय पाटील (३) आणि मोजी आटे (१) यांना बाद केले. अर्जुनने आपल्या क्रिकेट कारकिर्दीत प्रथमच एका डावात पाच विकेट्स घेण्याचा पराक्रम केला आहे. मोहित रेडकरने ३, तर कीथ पिंटोने २ गडी बाद केले.
प्रत्युत्तरादाखल खेळताना गोव्याने दिवसअखेर २ बाद ४१४ धावा केल्या. सलामीवीर इशान गडेकर ३ व सुयश प्रभूदेसाईने ७३ धावा करून बाद झाले. कश्यप बाकले १७९ आणि स्नेहल कवठणकर १४६ धावा करून मैदानावर आहेत. अरुणाचल प्रदेशतर्फे यब निया व जय भवसारने प्रत्येकी १ गडी बाद केला.