पर्थ : बहुप्रतिक्षित बॉर्डर-गावस्कर ट्रॉफी स्पर्धा अवघ्या काही तासांवर येऊन ठेपली आहे. भारत वि ऑस्ट्रेलिया कसोटी मालिकेतील शुक्रवार दि. २२ नोव्हेंबरपासून पर्थच्या ऑप्टस स्टेडियमवर पहिला कसोटी सामना खेळवला जाणार आहे. ५ सामन्यांच्या या कसोटी मालिकेसाठी दोन्ही संघ कसून तयारी करत आहेत. गेल्या दोन बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीमध्ये ऑस्ट्रेलियाला घरच्या मैदानावर पराभूत करणाऱ्या टीम इंडियासाठी ही मालिका खूप महत्त्वाची ठरणार आहे.
यावेळी भारताला घरच्या मैदानावर कडवे आव्हान देण्यासाठी ऑस्ट्रेलिया पूर्णपणे सज्ज आहे. रोहित शर्मा त्याच्या दुसऱ्या बाळाच्या जन्मामुळे पर्थ कसोटीला मुकणार आहे. तर त्याच्या जागी जसप्रीत बुमराह भारतीय संघाचे नेतृत्व करणार आहे. रोहित शर्माच्या जागी सलामीला कोण उतरणार याकडे सर्वांच्या नजरा लागल्या आहेत. दरम्यान, जागतिक कसोटी चॅम्पियनशिपच्या अंतिम फेरीत जाण्यासाठी भारतीय संघाला ऑस्ट्रेलियाचा किमान ४-० असा पराभव करावा लागेल.
यशस्वीसोबत राहुल सलामीला येण्याची शक्यताभारतीय कर्णधार रोहित शर्मा पर्थ कसोटीत खेळणार नाही. अशा परिस्थितीत केएल राहुल त्याच्या जागी यशस्वी जैस्वालसोबत सलामी करू शकतो. मात्र, अभिमन्यू ईश्वरन याचेही नाव दावेदारांमध्ये आहे. गिलच्या अंगठ्याला फ्रॅक्चर झाले आहे. त्याच्या जागी पडिक्कल तिसऱ्या क्रमांकावर असेल. मधल्या फळीत विराट कोहली चौथ्या, ऋषभ पंत पाचव्या आणि जुरेल सहाव्या स्थानावर असेल. विकेटकीपिंगची जबाबदारी पंत सांभाळेल.
हर्षित राणा-नितीश कुमार करणार पदार्पण?या सामन्यासाठी प्लेइंग इलेव्हनची निवड करणे भारतीय संघासमोर मोठे आव्हान असणार आहे. कारण कर्णधार रोहित आणि शुभमन पर्थ कसोटीत खेळणार नाहीत. त्यामुळे भारतीय संघ युवा खेळाडूंना संधी देण्याच्या तयारीत दिसत आहे. पर्थ कसोटीत हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी भारतासाठी कसोटी पदार्पण करण्याची शक्यता निर्माण झाली आहे.
बॉर्डर-गावस्कर ट्रॉफीचे वेळापत्रकपहिली कसोटी : २२-२६ नोव्हेंबर, पर्थ क्रिकेट स्टेडियम, पर्थ (सकाळी ७.५० वा.)
दुसरी कसोटी : ६-१० डिसेंबर, अॅडलेड ओव्हल, अॅडलेड (सकाळी ९:३० वा.)
तिसरी कसोटी : १४-१८ डिसेंबर, गाबा स्टेडियम, ब्रिस्बेन (सकाळी ५.५० वा.)
चौथी कसोटी : २६-३० डिसेंबर, मेलबर्न क्रिकेट ग्राउंड (सकाळी ५ वा.)
पाचवी कसोटी : ३-७ जानेवारी (२०२५), सिडनी क्रिकेट ग्राउंड (सकाळी ५ वा.)
विराट ठरणार सर्वाधिक झेल घेणारा खेळाडूबॉर्डर-गावस्कर ट्रॉफीच्या पहिल्या कसोटीत कोहलीने चार झेल घेण्यात यश मिळवले, तर ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्व फॉरमॅटमध्ये ७० झेल (विकेटकीपर नसलेला) घेणारा तो इतिहासातील पहिला खेळाडू ठरेल. ३६ वर्षीय कोहली आधीच आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक झेल घेणारा खेळाडू आहे. त्याच्या आधी ही कामगिरी भारताचा माजी क्रिकेटपटू राहुल द्रविडच्या नावावर होती.
ऑस्ट्रेलियाविरुद्ध सर्वाधिक झेल घेणारे खेळाडूविराट कोहली – ६६
राहुल द्रविड – ६३
इयान बोथम – ६२
जो रूट – ५८
कार्ल हुपर – ५७
सचिन तेंडुलकर – ५४
विराट कोहली पॉन्टिंगला टाकणार मागे :सध्या जागतिक क्रिकेटमधील महान फलंदाजांपैकी एक असलेला विराट कोहली ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या बॉर्डर-गावस्कर कसोटी मालिकेत ३५० धावा करताच मोठा विक्रम नोंदवणार आहे. तो ऑस्ट्रेलियाचा माजी कर्णधार रिकी पॉन्टिंगला मागे टाकेल. ज्यामुळे तो आतंरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तिसऱ्या क्रमांकावर पोहोचेल.
कसोटी क्रिकेटमध्ये होणार अनोखा विक्रम कसोटी क्रिकेटच्या इतिहासात वेगवान गोलंदाजांनी कसोटी सामन्यात दोन्ही संघांचे नेतृत्व केल्याचे क्वचितच घडले आहे. आता पुन्हा एकदा पर्थमधील कसोटीत घडणार आहे, जेव्हा दोन्ही संघांचे कर्णधार वेगवान गोलंदाज असतील. जसप्रीत बुमराह आणि पॅट कमिन्स हे दोघेही वेगवान गोलंदाज आहेत. कसोटी क्रिकेटच्या १४७ वर्षांच्या इतिहासात आतापर्यंत असे फक्त पाचवेळा घडले आहे, जेव्हा कसोटी सामन्यातील दोन्ही कर्णधार वेगवान गोलंदाज होते. आता कमिन्स आणि बुमराह सहावी जोडी ठरणार आहेत.
एकाच कसोटीत दोन्ही संघांचे नेतृत्व करणारे वेगवान गोलंदाज बॉब विलिस (इंग्लंड) वि. इम्रान खान (पाकिस्तान), १९८२ (बर्मिंगहॅम)
वसीम अक्रम (पाकिस्तान) वि. कोर्टनी वॉल्श (वेस्ट इंडीज), १९९७ (पेशावर)
हीथ स्ट्रीक (झिम्बाब्वे) वि. शॉन पोलॉक (दक्षिण आफ्रिका), २००१ (बुलावायो)
जेसन होल्डर (वेस्ट इंडीज) वि. सुरंगा लकमल (श्रीलंका), २०१८ (ब्रिजटाऊन)
पॅट कमिन्स (ऑस्ट्रेलिया) वि. टिम साउदी (न्यूझीलंड), २०२४ (ख्राईस्टचर्च)
भारत वि. ऑस्ट्रेलिया हेड टू हेड रेकॉर्ड (१९४७-२०२३)एकूण कसोटी सामने : १०७
ऑस्ट्रेलियाचे विजय : ४५
भारताचे विजय : ३२
अनिर्णित सामने : २९
बरोबरी : १
संभाव्य संघभारतीय संघ : रोहित शर्मा (कर्णधार), जसप्रीत बुमराह (उपकर्णधार), यशस्वी जैस्वाल, अभिमन्यू इश्वरन, शुबमन गिल, विराट कोहली, केएल राहुल, ऋषभ पंत (यष्टीरक्षक), सर्फराझ खान, ध्रुव जुरेल (यष्टीरक्षक), आर अश्विन, रवींद्र जडेजा, मोहम्मद सिराज, आकाश दीप, प्रसिध कृष्णा, हर्षित राणा, नितीश कुमार रेड्डी, वॉशिंग्टन सुंदर.
ऑस्ट्रेलिया संघ :पॅट कमिन्स (कर्णधार), स्कॉट बोलँड, अॅलेक्स कॅरी (यष्टीरक्षक), जोश हेझलवूड, ट्रॅव्हिस हेड, जोश इंग्लिस (यष्टीरक्षक), उस्मान ख्वाजा, मार्नस लॅबुशेन, नॅथन लियॉन, मिच मार्श, नॅथन मॅकस्वीनी, स्टीव्ह स्मिथ, मिचेल स्टार्क.