महिला एकेरीत भारताचे आव्हान संपुष्टात
शांघाय : भारताची आघाडीची बॅडमिंटनपटू पी.व्ही. सिंधू गुरुवारी चीन मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या दुसऱ्या फेरीत सिंगापूरच्या यिओ जिया मिननकडून पराभूत झाली. यासह तिचे स्पर्धेतील आव्हान संपुष्टात आले आहे.
दोन वेळची ऑलिम्पिक पदक विजेती पी. व्ही. सिंधूने सामन्याची सुरुवात चांगली केली. पण, सिंगापूरच्या यिओने चांगले पुनरागमन करत सामना जिंकला. सिंधूने पहिला गेम जिंकला. पण, तिला आपली लय कायम राखता आली नाही आणि तिला यिओकडून १६-२१, २१-१७, २१-२३ असा पराभव पत्करावा लागला.
तत्पूर्वी, बुधवारी महिला गटात सिंधूने ५० मिनिटे चाललेल्या पहिल्या फेरीच्या लढतीत तिच्यापेक्षा उच्च मानांकित थायलंडच्या बुसानन ओंगबामरुंगफानचा २१-१७, २१-१९ असा पराभव केला होता. जागतिक क्रमवारीत १९व्या स्थानी असलेल्या सिंधूचा जागतिक क्रमवारीत ११व्या क्रमांकावर असलेल्या बुसाननविरुद्धच्या २१व्या सामन्यातील हा २०वा विजय होता.
अनुपमा-मालविकाचाही पराभव
सिंधूसह अनुपमा उपाध्याय आणि मालविका बन्सोड यांना गुरुवारी झालेल्या दुसऱ्या फेरीत आपापल्या प्रतिस्पर्ध्यांकडून पराभव पत्करावा लागला. त्यामुळे चायना मास्टर्समधील महिला एकेरीतील भारताचे आव्हान संपुष्टात आले आहे.
लक्ष्य सेनची उपांत्यपूर्व फेरीत धडक
भारताचा स्टार बॅडमिंटनपटू लक्ष्य सेनने गुरुवारी येथे सरळ गेममध्ये विजय मिळवत चीन मास्टर्स सुपर ७५० बॅडमिंटन स्पर्धेच्या पुरुष एकेरीच्या उपांत्यपूर्व फेरीत धडक मारली. पॅरिस ऑलिम्पिकमध्ये कांस्यपदक हुकलेल्या लक्ष्यने पुरुष एकेरीच्या दुसऱ्या फेरीत रासमुस गेमकेचा २१-१६, २१-१८ असा पराभव केला. पुढील फेरीत लक्ष्याचा सामना जपानचा ताकुमा ओबायाशी आणि तिसरा मानांकित डेन्मार्कचा अँडर अँटोनसेन यांच्यातील विजेत्याशी होईल.