ऑस्ट्रेलिया सर्वबाद १०४ : भारताला २१८ धावांची आघाडी, यशस्वी, राहुलची अर्धशतके
पर्थ : भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पर्थमध्ये सुरू असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात टीम इंडियाचा दबदबा आहे. दुसऱ्या दिवसाचा खेळ संपेपर्यंत भारताने पहिल्या डावात एकही गडी न गमावता १७२ धावा केल्या होत्या. भारताने पर्थ कसोटीत २१८ धावांची आघाडी घेतली आहे. यादरम्यान यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी चमकदार कामगिरी केली. यशस्वी ९० धावा करून नाबाद आहे. राहुल ६२ धावा करून नाबाद आहे. या दोघांनी ऑस्ट्रेलियन गोलंदाजांची अवस्था बिघडवली आहे. ऑस्ट्रेलियाने पहिल्या डावात १०४ धावा केल्या होत्या.
भारताने पहिल्या डावात १५० धावा केल्या होत्या. पण दुसऱ्या डावात बिनबाद १७२ धावा केल्या. यावेळी राहुल आणि यशस्वी सलामीसाठी आले. राहुलने १५३ चेंडूंचा सामना करत नाबाद ६२ धावा केल्या. त्याने ४ चौकार मारले. यशस्वीने १९३ चेंडूंचा सामना करत नाबाद ९० धावा केल्या. तो शतकाच्या जवळ आहे. या खेळीत यशस्वीने ७ चौकार आणि २ षटकार मारले.
ऑस्ट्रेलियन गोलंदाजांना भारतीय सलामीच्या जोडीला बाद करता आले नाही. मिचेल स्टार्कने १२ षटकात ४३ धावा दिल्या. जोश हेझलवूडने १० षटकात ९ तर कर्णधार पॅट कमिन्सने १३ षटकात ४४ धावा दिल्या. नॅथन लायनने १३ षटकात ८ धावा दिल्या. मात्र, यापैकी एकाही गोलंदाजाला विकेट घेता आली नाही.
ऑस्ट्रेलियन डाव गडगडला
ऑस्ट्रेलियाचा संपूर्ण संघ १०४ धावांवर गडगडला. मिचेल स्टार्कने सर्वाधिक २६ धावा केल्या. सलामीवीर उस्मान ख्वाजा ८ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला. मॅकस्वीन १० धावा तर लॅबुशेन २ धावा करून करून बाद झाले. स्टीव्ह स्मिथला खातेही उघडता आले नाही. ट्रॅव्हिस हेड ११ धावा करून बाद झाला. मिचेल मार्श ६ धावा करून पॅव्हेलियनमध्ये परतला.
भारतीय गोलंदाजांनी केला कहर
बुमराहने भारतासाठी घातक गोलंदाजी केली. त्याने ५ बळी घेतले. बुमराहने १८ षटकात ३० धावा दिल्या. हर्षित राणाने ३ बळी घेतले. त्याने १५.२ षटकात ४८ धावा दिल्या. मोहम्मद सिराजने २ बळी घेतले. त्याने १३ षटकात २० धावा दिल्या. नितीश रेड्डी आणि वॉशिंग्टन सुंदर यांना एकही विकेट मिळाली नाही.
जैस्वालचा विक्रम
आपल्या कारकिर्दीतील नवव्या अर्धशतकासोबत २२ वर्षीय यशस्वी जैस्वालने अनेक विक्रमही आपल्या नावावर केले. जागतिक कसोटी चॅम्पियनशिप २०२३-२५ च्या चालू चक्रातील यशस्वी जैस्वालच्या बॅटमधून ही १२वी ५०+ धावसंख्या आहे. यासह त्याने इंग्लंडचा महान फलंदाज जो रूटची बरोबरी केली. पहिल्या डावाच्या जोरावर ४६ धावांची आघाडी घेतल्यानंतर यशस्वी जैस्वाल आणि केएल राहुल यांनी भारताला दमदार सुरुवात करून दिली. दोघांची शतकी भागीदारी कायम आहे.
२० वर्षांनंतर शतकी सलामीची भागीदारी
भारताच्या सलामीच्या जोडीने २० वर्षांनंतर ऑस्ट्रेलियात १००+ धावांची भागीदारी केली आहे. ही भारताची ऑस्ट्रेलियातील तिसरी सर्वात मोठी भागीदारी ठरली आहे. विशेष म्हणजे, भारताने २०१८ आणि २०२१ मध्ये सलग बॉर्डर गावस्कर ट्रॉफी जिंकली, परंतु असे असूनही, पहिल्या विकेटसाठी १०० पेक्षा जास्त धावांची भागीदारी कधीच झाली नाही. शेवटच्या वेळी आकाश चोप्रा आणि वीरेंद्र सेहवाग २००४ मध्ये ऑस्ट्रेलियाला गेले होते तेव्हा त्यांनी सिडनीमध्ये १२३ धावांची भर घातली होती.
जैस्वालने मिचेल स्टार्कला केले स्लेज
जगातील सर्वात धोकादायक गोलंदाजी आक्रमणाचा सामना करत यशस्वी जैस्वालने भारताला दमदार सुरुवात तर दिलीच पण कांगारू गोलंदाजांना डोळ्यासमोर ठेवूनही दमबाजी केली. यादरम्यान युवा यशस्वीने मिचेल स्टार्कचीही स्लेजिंग केली. तो स्टंप माईकमध्ये (इट्स कमिंग टू स्लो) असे म्हणताना ऐकू आला. म्हणजे तुझे बॉल माझ्यासाठी खूप स्लो आहेत.दरम्यान, या सामन्यात त्याने दोन षटकार मारताच विश्वविक्रम आपल्या नावावर केला. कसोटी क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणारा तो फलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम न्यूझीलंडच्या ब्रेंडन मॅक्क्युलमच्या नावावर होता.या सामन्यापूर्वी यशस्वी जैस्वालच्या नावावर यावर्षी कसोटी क्रिकेटमध्ये एकूण ३२ षटकार होते. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या सामन्याच्या दुसऱ्या डावात दोन षटकार मारताच त्याच्या नावाची संख्या ३४ षटकारांवर पोहोचली आणि कसोटी क्रिकेटच्या एका कॅलेंडर वर्षात सर्वाधिक षटकार मारणाऱ्या फलंदाजांच्या यादीत तो पहिल्या क्रमांकावर आला. याआधी २०१४ मध्ये मॅक्युलमने
एका वर्षात कसोटीत सर्वाधिक षटकार ठोकणारे फलंदाज
३३ षटकार मारले होते.
३४ - यशस्वी जैस्वाल (२०२४)*
३३ - ब्रेंडन मॅक्युलम (२०१४)
२६ - बेन स्टोक्स (२०२२)
२२- अॅडम गिलख्रिस्ट (२००५)
२२ - वीरेंद्र सेहवाग (२००८)
बुमराहचा विक्रम
जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाच्या धरतीवर पाच विकेट घेत एक विक्रम रचला आहे. दक्षिण अफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलिया या देशांमध्ये सर्वाधिक पाच गडी बाद करणारा गोलंदाज ठरला आहे. यापूर्वी हा विक्रम कपिल देवच्या नावावर होता. कपिल देव यांनी ६२ डावात ७ वेळा ५ गडी बाद करण्याचा विक्रम केला आहे. दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यांमध्ये सर्वाधिक वेळा ५ बळी घेऊन विक्रम केला होता. आता जसप्रीत बुमराहने ऑस्ट्रेलियाविरुद्ध पाच विकेट घेत कपिल देवच्या विक्रमाची बरोबरी केली आहे. बुमराहने दक्षिण आफ्रिका, इंग्लंड, न्यूझीलंड आणि ऑस्ट्रेलियामध्ये एकूण ५१ डाव खेळले आहेत आणि ७ वेळा ५ बळी घेतले आहेत. जसप्रीत बुमराह या देशात सर्वात कमी डावात ५ गडी घेणारा भारतीय गोलंदाज ठरला आहे. तसेच ऑस्ट्रेलियन भूमीवर कर्णधार गाेलंदाज म्हणून ५ बळी घेणारा तो कपिल देव यांच्यानंतर दुसरा भारतीय कर्णधार गोलंदाज ठरला आहे.