पहिला दिवस गाजवला गोलंदाजांनी

बॉर्डर गावसकर ट्रॉफी : भारत सर्वबाद १५०, ऑस्ट्रेलिया ७ बाद ६७

Story: न्यूज डेस्क । गोवन वार्ता |
23rd November, 12:18 am
पहिला दिवस गाजवला गोलंदाजांनी

पर्थ : बॉर्डर गावसकर ट्रॉफीतील पहिल्या कसोटी सामन्यातील पहिल्या दिवशी हेजलवूड-बुमराह शो पहायला मिळाला. भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया कसोटी सामन्यात गोलंदाजांनी १७ बळी घेतले.
टीम इंडियाने नाणेफेक जिंकून पहिल्या डावात १५० धावा केल्या. त्यानंतर भारतीय गोलंदाजांनी जोरदार पलटवार करत कांगारुंना दणका दिला. टीम इंडियाने ऑस्ट्रेलियाला ७ झटके दिले. ऑस्ट्रेलियाने दिवसाचा खेळ संपेपर्यंत २७ षटकांत ७ गडी गमावून ६७ धावा केल्या आहेत. त्यामुळे टीम इंडियाकडे अजून ८३ धावांची आघाडी आहे. आता दुसर्‍या दिवशी गोलंदाज ऑस्ट्रेलियाला झटपट ३ झटके देत टीम इंडियाला आघाडी मिळवून देतात का? याकडे साऱ्यांचे लक्ष असणार आहे.टीम इंडियाच्या १५० धावांचा पाठलाग करण्यासाठी आलेल्या ऑस्ट्रेलियाच्या टॉप ऑर्डरला कर्णधार जसप्रीत बुमराह याने सुरुंग लावला. बुमराहने नॅथन मॅकस्वीनी याला १० धावांवर बाद केले. त्यानंतर बुमराहने कांगारुंना सलग २ झटके दिले. उस्मान ख्वाजाने ८ धावा केल्या. तर स्टीव्हन स्मिथला भोपलाही फोडता आला नाही. त्यानंतर डेब्यूटंट हर्षित राणा याने ट्रेव्हिस हेडचा ऑफ स्टंप उडवला.
मोहम्मद सिराज याने मिचेल मार्श याला मैदानाबाहेरचा रस्ता दाखला. केएलने मिचेलचा कॅच घेतला. मिचेलने ६ धावा केल्या. सिराज मार्नस लबुनेशला २ धावांवर एलबीडब्ल्यू आऊट केले. तर त्यानंतर कर्णधाराने कर्णधाराला बाद केले. बुमराहने पॅट कमिन्सला ३ धावांवर विकेटकीपर ऋषभ पंतकरवी झेलबाद केले. तर मिचेल स्टार्क ६ आणि एलेक्स कॅरी १९ धावांवर नाबाद परतले. टीम इंडियाकडून जसप्रीत बुमराह याने सर्वाधिक ४ बळी घेतले. मोहम्मद सिराज २, तर हर्षित राणा याने १ बळी घेतला.
त्याआधी कर्णधार जसप्रीत बुमराहने नाणेफेके जिंकून फलंदाजीचा निर्णय घेतला. टीम इंडियाकडून हर्षित राणा आणि नितीश कुमार रेड्डी या दोघांनी पदार्पण केले. तर ऑस्ट्रेलियाकडून नॅथन मॅकस्वीनी याने डेब्यू केले. नियमित कर्णधार रोहित शर्मा याच्या अनुपस्थितीत यशस्वी जयस्वाल याच्यासह केएल राहुल ओपनिंगला आला. ही सलामी जोडी टीम इंडियाला चांगली सुरुवात करून देण्यात अपयशी ठरली.
यशस्वी जयस्वाल आणि तिसऱ्या स्थानी आलेला देवदत्त पडीक्कल हे दोघे शुन्यावर बाद झाले. विराट कोहली हा देखील अपयशी ठरला. विराट ५ धावा करून माघारी परतला. केएल राहुल घट्ट पाय रोवून उभा होता. मात्र पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळे केएलला मैदानाबाहेर जावे लागले. केएलने २६ धावा केल्या. ध्रुव जुरेल याने ११ धावांचे योगदान दिले. वॉशिंग्टन सुंदर याने ४ धावा केल्या. ऋषभ पंतने ३ धावांची खेळी केली.
हर्षित राणा याने ७ तर जसप्रीत बुमराह याने ८ धावा केल्या. तर डब्यूटंट नितीश कुमार रेड्डी याने पहिल्याच डावात टीम इंडियाकडून सर्वाधिक धावांचे योगदान दिले. नितीशने ४१ धावांची खेळी केली. त्यामुळे टीम इंडियाला १५० धावांपर्यंत पोहचता आले. ऑस्ट्रेलियाकडून जोश हेझलवूड याने सर्वाधिक ४ बळी घेतले. तर पॅट कमिन्स, मिचेल स्टार्क आणि मिचेल मार्श या तिघांनी प्रत्येकी २-२ बळी घेतले.
ऋषभ पंतचा विक्रम
ऋषभ पंत इतिहासातील सर्वात मोठी कामगिरी करणारा पहिला यष्टिरक्षक फलंदाज ठरला आहे. ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या पहिल्या डावात ऋषभ पंतने ७८ चेंडूत ३७ धावा केल्या. त्याच्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपमध्ये २०३४ धावा झाल्या आहेत. डब्ल्यूटीसीमध्ये यष्टिरक्षक फलंदाज म्हणून २००० धावा करणारा इतिहासातील पहिला खेळाडू ठरला आहे. इंग्लंडच्या ओली पोप आणि न्यूझीलंडच्या टॉम लॅथम यांच्याही डब्ल्यूटीसीमध्ये २००० पेक्षा जास्त धावा आहेत, परंतु त्यांनी त्यांच्या देशांसाठी नियुक्त विकेटकीपर म्हणून अनुक्रमे केवळ ४ आणि १ सामने खेळले आहेत.
डब्ल्यूटीसीमध्ये सर्वाधिक धावा करणारे भारतीय
रोहित शर्मा- २६८५
विराट कोहली- २४३२
ऋषभ पंत- २०३४
शुभमन गिल- १८००
चेतेश्वर पुजारा - १७६९ 

ऑस्ट्रेलियाने ४४ वर्षांनंतर केला लाजिरावाणाा विक्रम
ऑस्ट्रेलियन संघाने १९८० नंतर दुसऱ्यांदा एका लाजीरवाण्या विक्रमाची नोंद केली. असे घडण्याची ही दुसरी वेळ होती, जेव्हा ऑस्ट्रेलियाने मायदेशात कसोटी खेळताना ४० धावांचा आकडा गाठण्यापूर्वी ५ बळी गमावले. यापूर्वी २०१८ मध्ये दक्षिण आफ्रिकेनेही अशीच कामगिरी केली होती. त्या सामन्यात ऑस्ट्रेलियन संघाने दक्षिण आफ्रिकेसमोर पूर्णपणे शरणागती पत्करली होती. त्यावेळी होबार्टमध्ये खेळल्या गेलेल्या सामन्यात ऑस्ट्रेलियाने केवळ १७ धावांवर ५ विकेट गमावल्या होत्या. भारतासमोर ऑस्ट्रेलियाने ३८ धावांत ५ विकेट्स गमावल्या होत्या.
केएल राहुलचा अनोखा विक्रम
या सामन्यात २६ धावांची इनिंग खेळूनही केएलने कसोटी क्रिकेटमध्ये मोठे स्थान मिळवले. या खेळीच्या जोरावर त्याने कसोटी क्रिकेटमध्ये आपल्या ३००० धावा पूर्ण केल्या. कसोटीच्या ९२व्या डावात त्याने हा विशेष टप्पा गाठला. अशाप्रकारे, कसोटीत भारतासाठी ३००० हून अधिक धावा करणारा तो सातवा सक्रिय क्रिकेटपटू ठरला. यापूर्वी, कसोटीत सर्वाधिक धावा करणाऱ्या सक्रिय भारतीय क्रिकेटपटूंमध्ये विराट कोहली, चेतेश्वर पुजारा, अजिंक्य रहाणे, रोहित शर्मा, आर अश्विन आणि रवींद्र जडेजा यांचा समावेश आहे. आता केएलनेही या क्लबमध्ये प्रवेश केला आहे. केएलने ७४ चेंडूचा सामना करताना ३ चौकाराच्या मदतीने २६ धावा केल्या. मात्र, उपाहारापूर्वीच केएल मिचेल स्टार्कचा बळी ठरला. अशा प्रकारे त्याची छोटी पण महत्त्वपूर्ण खेळी संपुष्टात आली. केएल राहुलने भारताकडून कसोटी क्रिकेटमध्ये ५४ कसोटी सामन्यांमध्ये ३००७ धावा केल्या आहेत. या कालावधीत त्याची फलंदाजी सरासरी ३३.७८ आहे. या फॉरमॅटमध्ये त्याने ८ शतके झळकावली आहेत. २०१६ मध्ये चेन्नई येथे इंग्लंड विरुद्ध खेळल्या गेलेल्या कसोटी सामन्यात १९९ धावा ही त्याची सर्वोत्तम धावसंख्या आहे.
कसोटीत ३००० हून अधिक धावा सक्रिय खेळाडू
विराट कोहली- ९०४५
चेतेश्वर पुजारा- ७१९५
अजिंक्य रहाणे- ५०७७
रोहित शर्मा- ४२७०
आर अश्विन- ३४७३
रवींद्र जडेजा- ३२३५

केएल राहुल -३००७