ऋषभ पंत ठरला आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू

आयपीएल २०२५साठी मेगा लिलाव : भारतीय खेळाडूंना लागल्या कोट्यवधीच्या बोली

Story: न्यूज डेस्क। गोवन वार्ता |
24th November, 09:51 pm
ऋषभ पंत ठरला आयपीएल इतिहासातील सर्वांत महागडा खेळाडू

जेद्दाह : आयपीएल २०२५ च्या मेगा लिलावाचा पहिला तास खूपच रोमांचक होता. सुरुवातीला कोलकाता नाइट रायडर्सचा माजी कर्णधार श्रेयस अय्यर सर्वात महागडा खेळाडू ठरला. त्याला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले होते, मात्र काही वेळातच हा विक्रम मोडला गेला. यष्टिरक्षक फलंदाज ऋषभ पंत आयपीएलचा सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे.

ऋषभ पंतला लखनौ सुपर जायंट्सने २७ कोटी रुपयांना खरेदी केले. दिल्ली कॅपिटल्सने आरटीएमचा प्रयत्न केला, पण लखनौने लगेचच त्यांची रक्कम वाढवली. मग दिल्लीने हात वर केले. अशाप्रकारे लखनौने ऋषभ पंतला २७ कोटींमध्ये घेतले.

श्रेयस अय्यरला २६.७५ कोटी रुपये

गेल्या वर्षी कोलकाताला चॅम्पियन बनवणाऱ्या श्रेयस अय्यरलाही आयपीएल २०२५ च्या लिलावात मोठी रक्कम मिळाली. अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. आता ऋषभ पंत आयपीएलच्या इतिहासातील सर्वात महागडा खेळाडू ठरला आहे. श्रेयस अय्यर हा दुसरा सर्वात महागडा खेळाडू आहे. या दोन्ही खेळाडूंना त्यांच्या संघाने सोडले. केकेआरने श्रेयस अय्यरला सोडले तर ऋषभ पंतला दिल्ली कॅपिटल्सने सोडले. आता अय्यरला पंजाब किंग्जने २६.७५ कोटींना तर ऋषभ पंतला लखनऊने २७ कोटींना विकत घेतले आहे. या दोन्ही खेळाडूंना संघाचे कर्णधारपद मिळू शकते, असे मानले जात आहे.

जोस बटलर १५.७५ कोटींना विकला गेला

इंग्लंडचा स्फोटक यष्टिरक्षक फलंदाज जोस बटलरला विकत घेण्यासाठी अनेक संघांमध्ये स्पर्धा होती. मात्र, अखेरीस गुजरात टायटन्सने या स्टार सलामीवीराला १५.७५ कोटींना विकत घेतले. गेल्या मोसमापर्यंत बटलर राजस्थान रॉयल्स संघाचा भाग होता. लखनऊ सुपर जायंट्सनेही जोस बटलरला खरेदी करण्यासाठी मोठी बोली लावली. लखनौ आणि गुजरातमध्ये घनघोर युद्ध झाले. मात्र, अखेरीस बटलरला विकत घेण्यात गुजरातला यश आले.

व्यंकटेश अय्यर २३.७५ कोटीत पुन्हा कोलकातात

व्यंकटेश अय्यरचे नाव अष्टपैलू गटात आले तेव्हा या खेळाडूला विकत घेण्यासाठी लढत होईल, असे कुणालाही वाटले नसेल. अखेर कोलकाता नाईट रायडर्सने या अष्टपैलू खेळाडूला २३.७५ कोटी रुपयांना विकत घेतले. व्यंकटेश अय्यर आयपीएल २०२४ पर्यंत कोलकाता संघाचा भाग होता. मात्र, फ्रँचायझीने लिलावापूर्वी या खेळाडूला सोडले होते. आता पुन्हा एकदा कोलकाताने व्यंकटेश अय्यरचा आपल्या संघात समावेश केला आहे. यावेळी केकेआरने व्यंकटेश अय्यरला २३.७५ कोटींना विकत घेतले आहे.