लोकशाही बांगलादेश धार्मिक राष्ट्र बनताना पाहणे लाजिरवाणे
पणजी : बांगलादेशातील हिंदूंवरच्या अत्याचारांविरोधात आंदोलन करणारे साधू चिन्मय कृष्ण प्रभू यांच्या अटकेबद्दल सद्गुरू जग्गी वासुदेव यांनी तीव्र चिंता व्यक्त केली आहे.
सद्गुरू जग्गी वासुदेव म्हणाले, बांगलादेश हे एक लोकशाही राष्ट्र धार्मिक आणि हुकूमशाही राष्ट्र बनताना पाहणे लाजिरवाणे आहे. खुल्या लोकशाहीचे मूल्य समजून घेणे हे प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य आहे. धर्म किंवा कमकुवत लोकसंख्येच्या आधारे छळ करणे हा लोकशाही राष्ट्रांचा मार्ग नाही. दुर्दैवाने आपला शेजारी लोकशाही तत्त्वांपासून दूर गेला आहे.
सर्व नागरिकांना त्यांच्या गरजा आणि श्रद्धेनुसार जीवन जगण्याचा अधिकार आणि क्षमता असलेले लोकशाही राष्ट्र पुन्हा उभारणे हे बांगलादेशच्या प्रत्येक नागरिकाचे कर्तव्य असले पाहिजे, असे सद्गुरूंनी नमूद केले.
सद्गुरूंनी बांगलादेशी हिंदूंच्या सुरक्षिततेला आणि प्रतिष्ठेला सातत्याने पाठिंबा दर्शवला आहे.
दुसऱ्या एका पोस्टमध्ये सद्गुरूंनी जहालवादाची मुळे पसरण्यापासून रोखण्याचे महत्त्व अधोरेखित केले होते.
बांगलादेशी हिंदूंचे जीवन आणि प्रतिष्ठा सुरक्षित करण्याऱ्या उपायांची सद्गुरूंनी वारंवार मागणी केली आहे. सुरू असलेला हिंसाचार, मंदिरांचा विध्वंस आणि पद्धतशीर बहिष्कार यामुळे मानवतावादी संकट तसेच लोकशाही मूल्यांची खोल घसरण दिसून येते, असे त्यांनी नमूद केले.
संपूर्ण बांगलादेशात जमावाची हिंसा, जाळपोळ आणि हिंदू मंदिरांची विटंबना वाढली आहे. अल्पसंख्याक समुदायांना धमकावणी, विस्थापन आणि हल्ल्यांना तोंड द्यावे लागत आहे. न्याय मिळण्याची शक्यता कमी आहे. सण आणि धार्मिक मेळावे हिंसाचाराचे लक्ष्य बनले आहेत.
नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी कृतीची गरज
अनेकांना आपली श्रद्धा उघडपणे बाळगण्याची भीती वाटत आहे. या अत्याचारांविरोधात शांततापूर्ण आंदोलन करणाऱ्या चिन्मय कृष्ण प्रभू यांची अटक ही असहिष्णुतेच्या वातावरणाची वाढ दर्शवते. सर्व नागरिकांच्या सुरक्षिततेसाठी आणि समानतेसाठी तातडीने कृती करण्याची गरज सद्गुरुंनी अधोरेखित केली.