गोव्यातील प्रकृती चाचणी मोहिमेचा शुभारंभ
पणजी : गोव्यात देशव्यापी प्रकृती परिक्षण अभियान मोहिमेचा मंगळवारी शुभारंभ झाला. या मोहिमेंतर्गत गोव्यातील आरोग्य केंद्रांवर महिनाभरात १ लाख लोकांवर उपचार केले जातील, अशी माहिती आरोग्य सचिव अरुण कुमार मिश्रा यांनी दिली.
गोव्यात ही मोहीम राबवण्यात आली. तत्पूर्वी देशपातळीवर हे परिक्षण अभियान सुरू आहे. या मोहिमेचा पहिला टप्पा २६ नोव्हेंबर ते २५ डिसेंबर या कालावधीपर्यंत सुरू राहणार आहे. गोव्यातील आरोग्य केंद्रात दर महिन्याला १ लाख रुग्ण उपचारासाठी येतात. आरोग्य केंद्रातील आयुष डॉक्टर आयुर्वेदाच्या मदतीने त्यांच्या प्रकृतीची तपासणी करणार आहेत. यावेळी ते रुग्णांना आजारी पडण्याचा धोका आणि खबरदारी कशी घ्यावी याबद्दल सल्ला देतील. गोव्यात आयुर्वेदाची प्रॅक्टिस करणारे ९७८ डॉक्टर आहेत. आरोग्य केंद्रात २०० आयुष डॉक्टर आहेत. रुग्णांना त्यांचे मन आणि शरीर निरोगी ठेवण्यासाठी दैनंदिन आहार, जीवनशैली आणि व्यायाम कसा करावा याबद्दलची माहिती ते देणार आहेत.
या मोहिमेला गोव्याच्या संघटक डॉ. स्नेहा भागवत, डॉ. मीनल जोशी आदी डॉक्टर्स उपस्थित होते. दरम्यान, मन स्थिर ठेवण्यासाठी आणि आरामदायी जीवन जगण्यासाठी आयुर्वेद चिकित्सा पूरक आहे. यामुळे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी सुरू केलेल्या देशव्यापी प्रकृती परिक्षण अभियानाची सुरुवात झाली आहे.