गोवाः क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो: गोव्याच्या ओंकार नाईक प्रभावी कामगिरी

चित्रीकरणाचे शेवटचे तीन टप्पे खूप आव्हानात्मक

Story: समीप नार्वेकर। गोवन वार्ता |
26th November, 12:33 am
गोवाः क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो: गोव्याच्या ओंकार नाईक प्रभावी कामगिरी

पणजीः ओंकार नाईकने चित्रपटसृष्टीत मोठा प्रभाव पाडला आहे. ओंकार नाईक याने १०० क्रिएटिव्ह माइंड्स ऑफ टुमारो या ४८ तासांत चित्रपट निर्मिती स्पर्धेत देशातील इतर १०० तरुण चित्रपट निर्मात्यांसोबत भाग घेऊन त्यांच्या टीमसाठी सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट असे दोन पुरस्कार जिंकले. अशा प्रकारची स्पर्धा गोव्यातील चित्रपट सृष्टीला बॉलिवूडच्या पातळीवर नेण्यास मदत करेल, असे ओंकारने सांगितले. 

क्रिएटिव्ह माइंड ऑफ टुमारो स्पर्धेत ४८ तासांत चित्रपट बनवण्यासाठी १०० जणांनी सहभाग घेतला होता. त्यांच्या सहा जणांची एक टीम तयार करून ठराविक बजेटमध्ये आणि ४८ तासांच्या आत ५ ते ६ मिनिटांची शॉर्ट फिल्म तयार करण्यास सांगितले होते. गोव्याचा ओंकार नाईक हा सहाय्यक दिग्दर्शक म्हणून सहभागी झाला होता. 

याविषयी बोलताना ओंकार म्हणाला की, गोव्यातील एका चित्रपट निर्मात्याला बाहेरच्या उदयोन्मुख चित्रपट निर्मात्यांसोबत काम करताना खूप काही शिकायला मिळाले. ४८ तासांतील चित्रीकरणाचे शेवटचे तीन टप्पे खूप आव्हानात्मक होते. 

अशा आव्हानांमधून शिकण्यासारखे बरेच काही आहे. गोव्यात चित्रपटांची निर्मिती होते मात्र बऱ्याचशा गोष्टी आम्हाला माहीत नाहीत. मी फिल्म स्कूलमध्ये शिकलो नाही. मी चित्रपट बघून चित्रपट बनवायला शिकलो. प्रॉडक्शन डिझाईन, स्क्रिप्ट रायटिंग, दिग्दर्शन आणि सिनेमॅटोग्राफी या गोष्टींबाबत खूप काही शिकता आले.

४८ तासांचे आव्हान
चित्रपट निर्मितीबाबत ओंकार म्हणाला, ४८ तासांत चित्रपट बनवणे हे मोठे आव्हान होते. दोन दिवसांपूर्वीच आम्हाला स्क्रिप्ट देण्यात आली होती. यामध्ये कोणती ठिकाणे निवडायची, कोणती शूटिंग लेन्स वापरायची, स्क्रिप्ट आणखी कशी सुधारायची आणि कलाकारांची निवड या गोष्टींचा समावेश होता. मी सहाय्यक दिग्दर्शक आणि निर्माता या टीममध्ये होतो. पाच चित्रपट स्पर्धांमध्ये सहभागी झालेल्या आमच्या चित्रपटांना सर्वोत्कृष्ट अभिनेत्री आणि सर्वोत्कृष्ट पटकथा पुरस्कार मिळाले. 

आम्ही शिकत राहू ...
आता भविष्यात म्युझिक व्हिडिओ, शॉर्ट फिल्म आणि फीचर फिल्म्स बनवण्याचा माझा विचार आहे. गोव्यात चांगली निर्मिती असलेल्या या चित्रपटाला बॉलीवूडच्या स्तरावर कसे घेऊन जाता येईल यावर आमचा भर असेल. आम्ही शिकत राहू आणि आणखी सुधारणा करण्याचा प्रयत्न करू.- ओंकार नाईक