स्व. चंद्रकांत केणी पुरस्कार सोहळा : धर्मानंद कामत यांना पुरस्कार प्रदान
धर्मानंद कामत यांना पुरस्कार प्रदान करताना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू. सोबत सुरेश वाळवे, अनिल पै आणि प्रमोद आचार्य.
पणजी : संस्कृती जपण्यासाठी भाषा टिकवून ठेवणे गरजेचे आहे. दिवंगत चंद्रकांत केणी यांनी पत्रकारिता तसेच चळवळीतून भाषा जपली. पत्रकारिता आणि साहित्य क्षेत्रात कार्यरत असताना त्यांनी गोव्याची संस्कृती जपण्याचे मोलाचे कार्य केले. आज गोवा जपण्याची गरज आहे, असे मत माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांनी व्यक्त केले.
पणजी येथील सरस्वती मंदिर सभागृहात स्व. चंद्रकांत केणी पुरस्कार वितरण सोहळा पार पडला. धर्मानंद कामत यांना माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या हस्ते हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर सुरेश वाळवे, अनिल पै आणि प्रुडंट मीडियाचे संचालक संपादक प्रमोद आचार्य उपस्थित होते. चंद्रकांत केणी यांच्याशी माझे जवळचे संबंध होते. मर्यादित साधनांमध्येही त्यांनी उत्तम काम केले, असे सांगून धर्मानंद कामत यांनी स्व. केणी यांच्या कार्याचा गौरव केला.
दिवंगत चंद्रकांत केणी यांचे राज्यासाठी मोठे योगदान आहे. त्यांच्या नावाचा रस्ता मडगावमध्ये अद्याप नाही, हे दुर्दैवी आहे, असे सुरेश वाळके यांनी सांगितले. अनिल पै यांनी स्वागतपर भाषण केले. प्रुडंट मीडियाचे संचालक संपादक प्रमोद आचार्य यांनी आभार व्यक्त केले. स्व. चंद्रकांत केणी पत्रकारिता पुरस्कार दरवर्षी मोठा व्हायला हवा. आज आम्ही कोकणी मराठी लिपीत लिहितो. भविष्यात काय स्थिती होईल याचा विचार करायला हवा, असे आचार्य म्हणाले.
वृत्तपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली!
इतर माध्यमांच्या तुलनेत वृत्तपत्रांनी आपली विश्वासार्हता जपली आहे. संविधानामागील सत्य शोधण्यासाठी लोक आजही वृत्तपत्रांवर अवलंबून असतात. भाषिक वृत्तपत्रांचा खप वाढत आहे. चंद्रकांत केणी यांच्या राष्ट्रमतसाठी मी दिल्लीत पत्रकारिताही केली आहे, असे धर्मानंद कामत यांनी पुरस्कार स्वीकारल्यानंतर सांगितले.