गोवा वुमन फोरमची मागणी : दक्षिण गोवा पोलीस अधीक्षकांना निवेदन सादर
मडगाव : मडगाव येथील महिला पोलीस स्थानक सध्या दक्षिण गोवा पोलीस मुख्यालयाच्या परिसरात कार्यरत आहे. त्यासाठी स्वतंत्र्य जागा उपलब्ध करावी व जादा पोलीस कर्मचार्यांची उपलब्धता करावी, अशी मागणी गोवा वुमन फोरम यांच्यावतीने करण्यात आली आहे. तसेच विविध पोलीस ठाण्यात महिला कर्मचार्यांची उपलब्धता करण्याची मागणी केली आहे.
गोवा वुमन फोरमच्या शिष्टमंडळाने दक्षिण गोवा पोलीस अधीक्षक सुनीता सावंत यांची भेट घेत निवेदन सादर केले. महिलांवरील हिंसाचार निर्मूलनाच्या आंतरराष्ट्रीय दिनानिमित्त गोवा वुमन फोरमच्या शिष्टमंडळाने विविध मागण्या सादर केल्या आहेत. दक्षिण गोव्याच्या विविध पोलीस ठाण्यात आवश्यक महिला पोलीस उपनिरीक्षकांची नेमणूक करत त्याबाबत माहितीफलक लावण्यात यावेत. महिलांना त्यांच्या अधिकारांबाबत जागरूक करण्यासाठी तालुकानिहाय मार्गदर्शन शिबिरांचे आयोजन करण्यात यावे. ज्येष्ठ महिला नागरिक, शिक्षकांनाही नव्या कायद्यांची माहिती देण्यात यावी. शाळांतून मार्गदर्शन कार्यक्रम घेत हिंसाचाराच्या गुन्ह्यांमध्ये कायद्यांबाबतची माहिती द्यावी. परराज्यांतून आलेल्या व्यक्तींच्या पडताळणीबाबत जागृती करणे. महिलांविरोधातील गुन्ह्यांवरील खटल्यांची माहिती सामाजिक कार्यकर्त्यांना मिळावी व त्यांच्याकडून पीडितांना मदत व्हावी यासाठी वेबसाईटची निर्मिती करावी. जिल्हाधिकारी कार्यालयाशी संलग्नित महिलांवरील अत्याचार, वेश्याव्यवसाय, मानवी तस्करी, एस्कॉर्ट वेबसाईट या प्रकारांबाबत माहिती देत समाजाला जागरूक करण्यासाठी कार्यक्रम घडवून आणावेत, अशा मागण्या करण्यात आल्या आहेत.