एकूण ३.२५ लाखांचा मुद्देमाल जप्त.
म्हापसा : गौरावाडा कळंगुट येथे ऑस्ट्रेलियन पर्यटक वास्तव्यास असलेल्या व्हिलामध्ये मागेच चोरीचा प्रकार घडला होता. याप्रकरणी पोलिसांनी तपासचक्रे गतिमान करत डी.एम. संतोषा (२७, शिमोगा कर्नाटक) या सराईत चोरट्यास अटक केली. तसेच संशयिताकडून ३ लाखांच्या वस्तू जप्त केल्या.
ही चोरीची घटना गेल्या दि. १६ नोव्हेंबर रोजी घडली होती. या प्रकरणी अॅश्ली या पर्यटकाने कळंगुट पोलिसांत तक्रार केली होती. फिर्यादींचे कुटूंब मध्यरात्री व्हिलामध्ये नसल्याची संधी साधून संशयित आरोपीने आत प्रवेश केला. आतील ३ लॅपटॉप, एक घड्याळ व २५ हजार देशी विदेशी चलन असा एकूण ३.२५ लाखांचा मुद्देमाल लंपास केला होता. दरम्यान कासा दास इम्रास या व्हिलाच्या आवारातील सीसीटीव्हीमध्ये संशयित आरोपीचा चेहरा कैद झाला होता.
संशयित आरोपी चोरी केल्यानंतर आपल्या मुळ गावी पसार झाल्याची माहिती पोलिसांना चौकशीत मिळाली होती. त्यानुसार पोलिसांच्या पथकाने शिमोगा कर्नाटक येथे जाऊन संशयिताच्या मुस्क्या आवळल्या व गोव्यात आणून त्यास रितसर अटक केली. याप्रकरणी पोलीस निरीक्षक परेश नाईक यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक योगेश मांद्रेकर, राजाराम बागकर, हवालदार सतीश सावंत, विद्यानंद आमोणकर, कॉन्सटेबल विजय नाईक, भगवान पालयेकर, राजा परब, आदर्श नागेकर, गौरव चोडणकर व प्रणय गावस या पथकाने ही कामगिरी केली. संशयित आरोपी हा सराईत चोरटा असून देशातील विविध भागात त्याने चोर्या केल्या आहेत.