रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार

निवडणूक काळात काँग्रेसच्या तक्रारीवरून पदावरून शुक्ल यांना हटवले होते

Story: वेब डेस्क । गोवन वार्ता |
26th November, 11:20 am
रश्मी शुक्ला यांची पुन्हा पोलीस महासंचालकपदी नियुक्ती, आज पदभार स्वीकारणार

मुंबई: रश्मी शुक्ला यांची पुन्हा राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती करण्यात आली आहे. संजय कुमार वर्मा यांच्याकडून रश्मी शुक्ला पदभार स्वीकारणार आहेत. सोमवारी रश्मी शुक्ला यांनी देवेंद्र फडणवीस यांची भेट घेतली. आजच महासंचालकपदाचा कार्यभार सांभाळणार असल्याची माहिती मिळाली आहे.  

विधानसभा निवडणुकीवेळी काँग्रेसने त्यांच्याविरोधात तक्रारी दिल्या होत्या. काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्या मागणीनंतर  निवडणुकीपूर्वी भारतीय निवडणूक आयोगाच्या सूचनेनुसार डीजीपी रश्मी शुक्ला यांना पदावरून हटवले होते. त्यांच्या जागी वरिष्ठ आयपीएस अधिकारी संजय कुमार वर्मा यांनी डीजीपी म्हणून पदभार स्वीकारला होता.

रश्मी शुक्लांविरोधात आरोप काय आहेत?

महाविकास आघाडी सरकार असताना २०१९ मध्ये राज्याच्या गुप्तचर विभागाच्या आयुक्त असताना शुक्ला यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांचे आणि एकनाथ खडसे यांचे फोन टॅप केले होते, असा आरोप शुक्ला यांच्यावर आहे. कुलाबा पोलीस ठाण्यात शुक्ला यांच्याविरोधात ६ मार्च २०२१ रोजी गुन्हा दाखल करण्यात आलाय. २०१६-१७ या काळात पुण्याचे पोलीस आयुक्त असताना शुक्ला यांनी काँग्रेस नेते नाना पटोले यांचा फोन अमजद खान या ड्रग माफियाच्या नावे टॅप केला होता. हा प्रकार उघड झाल्याने पुण्याच्या बंडगार्डन पोलीस ठाण्यात फेब्रुवारी २०२२ मध्ये गुन्हा दाखल करण्यात होता.

कोण आहेत रश्मी शुक्ला ?

रश्मी शुक्ला १९८८ च्या बॅचच्या महाराष्ट्र केडरच्या IPS अधिकारी आहेत. केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या अतिरिक्त महासंचालक म्हणूनही शुक्ला यांनी काम केलंय. रश्मी शुक्ला या राज्याच्या पोलीस महासंचालकपदी नियुक्ती होणार्‍या पहिल्या महिला ठरल्या होत्या. रश्मी शुक्ला काही काळ पुण्याच्या पोलीस आयुक्तपदी होत्या. राज्याच्या गुप्तचर शाखेचे संचालकपदही रश्मी शुक्ला यांनी भूषवलं आहे.

हेही वाचा