इस्कॉनने भारत सरकारला हस्तक्षेप करण्याचे केले आवाहन
बांगलादेश : इस्कॉनशी संबंधित धार्मिक नेता चिन्मय कृष्ण दास प्रभू यांना सोमवारी दुपारी ढाका येथे अटक करण्यात आली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, त्यांच्यावर देशद्रोह आणि जातीय सलोखा बिघडवल्याचा गुन्हा दाखल करण्यात आल्याची माहिती चिन्मय प्रभू यांचे सहाय्यक आदि प्रभू यांनी दिली. त्यांच्या सुटकेच्या मागणीसाठी ढाका येथे निदर्शने सुरू झाली असून आंदोलकांनी ढाक्यातील सेहाबागमधील प्रमुख रस्ता अडवला आहे. याशिवाय दिनाजपूर आणि चितगावमध्येही आंदोलकांनी रस्ते अडवत घोषणाबाजी सुरु केल्याची माहितेय हाती आली आहे.
बांगलादेशच्या मीडियानुसार, चिन्मय प्रभू ढाका ते चितगावला हजरत शाहजलाल आंतरराष्ट्रीय विमानतळावर पोहोचले होते, येथून त्यांना डिटेक्टिव पोलिसांनी अटक केली. घटनास्थळी उपस्थित इस्कॉन सदस्यांचे म्हणणे आहे की डीबी पोलिसांनी कोणतेही अटक वॉरंट दाखवले नाही. त्यांनी फक्त बोलायचे आहे असे सांगितले. यानंतर त्यांनी त्यांना मायक्रोबसमध्ये बसवले.
चिन्मय प्रभू यांना चिन्मय कृष्ण दास ब्रह्मचारी म्हणूनही ओळखले जातात. बांगलादेशात हिंदूंवर होणाऱ्या हल्ल्यांविरोधात त्यांनी निदर्शने केली आहेत. बांगलादेश सनातन जागरण मंचने २५ ऑक्टोबर रोजी चितगाव येथे रॅली काढली. याला चिन्मय कृष्ण दास यांनीही संबोधित केले. रॅलीनंतर लगेचच बीएनपी नेते फिरोज खान यांनी चित्तगावमध्ये चिन्मय कृष्णा दास यांच्यावर देशद्रोहाचा खटला दाखल करत राष्ट्रध्वजाचा अपमान केल्याचा त्यांच्यावर आरोप करण्यात आला.
ढाका विद्यापीठात आंदोलन करणाऱ्या हिंदूंवर लाठीहल्ला -
चिन्मय प्रभू यांच्या सुटकेसाठी आंदोलन करणाऱ्या हिंदूंवर ढाका विद्यापीठाच्या जगन्नाथ हॉलमध्ये हल्ला करण्यात आला. विद्यार्थी असल्याचा दावा करणाऱ्या हल्लेखोरांनी हिंदूंवर लाठीहल्ला करून त्यांना पांगवले. ज्या भागात हिंदूंवर हल्ला झाला तो भाग शाहबाग पोलिस स्टेशनपासून अवघ्या ३० मीटर अंतरावर आहे.
'इस्कॉनचा दहशतवादाशी काहीही संबंध नाही'
आता या प्रकरणी इस्कॉनचा दहशतवादाशी संबंध आहे, असा निराधार आरोप करणे संतापजनक असल्याचे इस्कॉनने म्हटले आहे. इस्कॉनने भारत सरकारला तातडीने कारवाई करून बांगलादेश सरकारशी बोलण्याची विनंती केली आहे. तसेच बांगलादेश हिंदू बौद्ध ख्रिश्चन युनिटी कौन्सिलने त्यांच्या अटकेचा निषेध केला आहे.