‘आयडीलीक’कडून ३.२५ कोटी पोलिसांत जमा

मायरन राॅड्रिग्ज विरोधातील प्रकरण : मुंबई न्यायालयाकडून कंपनीला क्लिन चीट

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th November, 12:32 am
‘आयडीलीक’कडून ३.२५ कोटी पोलिसांत जमा

पणजी : अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केलेल्या मायरन राॅड्रिग्ज याच्या विरोधात मुंबई पोलिसाच्या हाऊसिंग बोर्ड पोलीस स्थानकात आणखी एक गुन्हा नोंद झाला आहे. दरम्यान, आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) संशयित केलेल्या आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीने तेथील न्यायालयाच्या आदेशानुसार, वरील पोलीस स्थानकात ३.२५ कोटी रुपये जमा केले आहेत. तसेच तेथील न्यायालयाने या रकमेचा काही भाग तक्रारदाराला परत करून या कंपनीला क्लिन चीट दिल्याची माहिती समोर आली आहे. 

मायरन राॅड्रिग्ज यांचे मुंबईतील प्रकरण

संशयित मायरन राॅड्रिग्ज आणि त्याच्या पत्नीने जादा व्याज देण्याचे आमिष दाखवून फसवणूक केल्या प्रकरणी सोमा आंद्राद यांनी ६ जानेवारी २०२४ रोजी मुंबई पोलिसांच्या हाऊसिंग बोर्ड पोलीस स्थानकात तक्रार दाखल केली. त्यानुसार, संशयित मायरन राॅड्रिग्ज त्याची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्ज यांनी २८ डिसेंबर २०२० ते ३ मे २०२३ दरम्यान ५.१५ कोटी रुपयांची फसवणूक केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, मुंबई पोलिसाच्या हाऊसिंग बोर्ड पोलिसांनी चौकशी करून संशयित मायरन राॅड्रिग्ज, त्याची पहिली पत्नी सुनीता राॅड्रिग्ज आणि दुसरी पत्नी दीपाली परब याच्याविरोधात भादंसंच्या कलम ४०६, ४२० आणि आरडब्ल्यू ३४ अंतर्गत गुन्हा दाखल करून तपास सुरू केला. याच दरम्यान मायरन यांनी गोव्यातील आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीत ३.२५ कोटी रुपयांची गुंतवणूक केल्याची माहिती तेथील पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी महाराष्ट्र ठेवीदारांचे हित संरक्षण कायद्याअंतर्गत कारवाई सुरू केली. त्यानुसार, पोलिसांनी प्रक्रिया करून वरील कंपनीचे बँक खाते गोठवले. त्यानंतर कंपनीचे संचालक नॉलन आंताव यांनी मुंबई येथील सत्र न्यायालयात अर्ज दाखल करून बँक खाते मुक्त करण्याची मागणी केली. तसेच मायरन याने त्याच्या कंपनीत गुंतवणूक केलेली ३.२५ कोटी रुपये संबंधित प्राधिकरणाकडे जमा केल्याची माहिती दिली. त्यानंतर वरील न्यायालयाने कंपनीने वरील रक्कम जमा केल्याचे निरीक्षण नोंद करून २ सप्टेंबर २०२४ रोजी कंपनीचे बँक खाते मुक्त करण्याचा आदेश जारी केला. याशिवाय न्यायालयाने वरील रक्कमेपैकी १.५ कोटी रुपये तक्रारदार आणि तिचे पती फ्रान्सिस आणि तिचे कर्मचारी जोशुवा अॅवनर याच्या खात्यात प्रत्येकी ५० लाख रुपये जमा करण्याचाही वेगळा आदेश ७ नोव्हेंबर २०२४ रोजी जारी केला. 

‘आयडीलीक’च्या संचालकांना अंतरिम दिलासा

गोवा पोलिसांच्या आर्थिक गुन्हा विभागाने (ईओसी) अधिक व्याज देण्याचे आमिष दाखवून लोकांची फसवणूक केलेल्या मायरन राॅड्रिग्ज याच्या प्रकरणात २१ नोव्हेंबर रोजी आयडीलीक गोवन गेटवेज कंपनीचे संचालक नॉलन आंताव, ज्योकिम रोझारियो पिरीस, विजय जाॅयल, नवनीक परेरा आणि सुशांत घोडगे यांना संशयित केले आहे. ईओसीच्या गुन्ह्यात संशयित केल्याची माहिती मिळाल्यानंतर आयडीलीकच्या संचालकापैकी पिरीस वगळता इतरांनी २२ रोजी पणजी येथील उत्तर गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात धाव घेऊन अंतरिम अटकपूर्व जामिनासाठी अर्ज दाखल केला. तसेच मुंबई येथील न्यायालयाने दिलेल्या आदेशाची माहिती त्या अर्जात जोडली. या संदर्भात न्यायालयात सुनावणी झाली असता, संशयितातर्फे अॅड. सिद्धार्थ सरदेसाई यांनी युक्तिवाद मांडून मायरन यांनी कंपनीत जमा केलेली रक्कम मुंबईतील न्यायालयाच्या आदेशानुसार तेथील पोलीस स्थानकात जमा केली. तसेच अंतरिम दिलासा देण्याचा युक्तिवाद केला. त्यानुसार न्यायालयाने अंतरिम दिलासा देत पुढील सुनावणी २९ रोजी ठेवली आहे.