रुमडामळ पंचायतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

पंचायत मंडळाची अतिक्रमण हटाव मोहीम : रस्त्यावर अतिक्रमण न करण्याचे आवाहन

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
26th November, 12:35 am
रुमडामळ पंचायतीने मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवली

अतिक्रमण मोहिमेत सहभागी पंच सैमुल्ला फनीबंध, सचिव संजीव नाईक व इतर. (संतोष मिरजकर)

मडगाव : रुमडामळ पंचायतीच्या परिसरातील रस्त्यावरील अतिक्रमणांचा मुद्दा ग्रामसभेत आला होता. त्यानुसार रुमडामळ पंचायत मंडळाकडून सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम राबवत अतिक्रमणे काढायला लावली. यापुढेही लोकांनी रस्त्यावर पार्किंग व अतिक्रमण न करता व्यवसाय करावेत, असे आवाहन पंच सैमुल्ला फनीबंध यांनी केले.
रुमडामळ दवर्ली पंचायतीची ग्रामसभा रविवारी पार पडली. या ग्रामसभेत सिलिंडर स्फोटाचा विषय चर्चेला आला होता. तसेच मुख्य रस्त्यांवरील अतिक्रमणांवेळी आपत्कालीन वेळी कोणत्याही गाडीला रस्त्यावरून मार्गक्रमण करताना त्रास होत असल्याचा मुद्दाही मांडण्यात आला. येथील रहदारी सुरळीत व्हावी यासाठी दुकानांबाहेर थाटण्यात आलेली विक्रीची दुकाने काढण्यात यावीत, रस्त्यांवर लावण्यात येणार्‍या गाड्यांवर कारवाई करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. ग्रामसभेत पंचायत मंडळाकडून मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणे हटवण्यात येतील, असे आश्वासन नागरिकांना दिले होते. त्यानुसार सोमवारी सकाळी अतिक्रमण हटाव मोहीम सुरू करण्यात आली.
यावेळी पंचायत सचिव संजीव नाईक, पंच सैमुल्ला फनीबंध व इतर पंच उपस्थित होते. पंचायत मंडळ, सचिवांनी रस्त्यावर, पार्किंग जागेतील तसेच गटारांवर करण्यात आलेले अतिक्रमण काढण्यास लावले. यापूर्वी पंचायतीकडून अतिक्रमण करण्यात आलेल्या दुकानांना नोटीस बजावत दुकाने काढण्यास सांगण्यात आले होते. त्यानुसार काही दुकानदारांनी गटारांवरही लावलेली दुकाने काढली होती.
पंच फनीबंध यांनी सांगितले की, रुमडामळ ग्रामसभेत लोकांनी मुख्य रस्त्यावरील अतिक्रमणांमुळे त्रास होत असल्याचा मुद्दा मांडला होता. त्यानुसार ते हटवण्याचे आश्वासन दिले होते. यापूर्वी महिनाभरापूर्वीच पंचायतीकडून सदर अतिक्रमण केलेल्या दुकानांना नोटीस काढण्यात आल्या होत्या. आता उर्वरित दुकानदारांना त्यांनी ठेवलेले फलक व इतर साहित्य काढावयास लावत रस्त्यावर कोंडी होणार नाही याची काळजी घेण्याचे सांगण्यात आले आहे. पंचायत ही लोकांसाठी असून लोकांनीही सहकार्य करण्याची गरज आहे. वाहतुकीला अडथळा होईल अशाप्रकारे कोणालाही मालाची विक्री करू देण्यात येणार नाही, असेही त्यांनी सांगितले.
आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करा!
सचिव संजीव नाईक यांनी सांगितले की, रुमडामळ पंचायतीकडे अतिक्रमणाबाबत आलेल्या तक्रारीनुसार कारवाईची मोहीम हाती घेण्यात आली होती. यात काहींनी गटारांवर व्यवसाय करणे, बेकायदा बांधकामेही केल्याचे आढळून आले आहे. याबाबत नोटीसा देऊनच ही मोहीम राबवली होती. नागरिकांनी आपली जबाबदारी ओळखून नियमांचे पालन करत, सर्व परवानगी घेत कोणालाही अडथळा होणार नाही याची काळजी घ्यावी, असेही ते म्हणाले.
...