विकलांग मुलीवर लैंगिक अत्याचार ; ३८ वर्षीय आरोपी दोषी

प्रतिनिधी । गोवन वार्ता


26th November, 11:11 pm
विकलांग मुलीवर लैंगिक अत्याचार ; ३८ वर्षीय आरोपी दोषी

पणजी : सासष्टी तालुक्यातील मानसिकदृष्ट्या विकलांग आणि सौम्य मतिमंदता असलेल्या १७ वर्षीय अल्पवयीन मुलीवर २०१९ मध्ये लैंगिक अत्याचार करण्यात आला. या प्रकरणी पणजी येथील जलदगती व पॉक्सो न्यायालयाने मूळ कर्नाटकातील ३८ वर्षीय आरोपीला दोषी ठरविले आहे. याबाबतचा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.

या प्रकरणी १७ वर्षीय पीडित मुलीच्या वडिलाने कोलवा पोलीस स्थानकात १० आॅक्टोबर २०१९ रोजी तक्रार दाखल केली होती. त्यानुसार, पीडित मुलगी संशयित युवकाने मानसिकदृष्ट्या विकलांग आणि सौम्य मतिमंदता आहे. संशयिताने ८ ते १० आॅक्टोबर २०१९ या कालावधीत पीडित मुलीवर वेगवेगळ्या ठिकाणी नेऊन तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे म्हटले आहे. त्यानुसार, पोलिसांनी संशयित युवकाविरोधात भादंसंच्या कलम ३७६ आणि बाल लैंगिक शोषण विरोधी कायदा २०१२ (पॉक्सो) कायद्याच्या ४ व ६ कलमांतर्गत गुन्हा दाखल करून अटक केली होती. त्यानंतर कोलवा पोलिसांनी तपास पूर्ण करून २६ नोव्हेंबर २०१९ रोजी मडगाव येथील दक्षिण गोवा जिल्हा व सत्र न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. या प्रकरणाची पुढील सुनावणीसाठी ९ मार्च २०२२ रोजी पणजी येथील जलदगती व पॉक्सो न्यायालयात वर्ग करण्यात आले. या प्रकरणी प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन न्यायालायने संशयित विरोधात आरोप निश्चित करून खटला सुरु केला. या प्रकरणी सरकारी वकील अर्चना भोबे यांनी युक्तिवाद मांडून आरोपी विरोधातील पुरावे सिद्ध केले. या प्रकरणी न्यायालयाने पुराव्यांची दखल घेऊन ३८ वर्षीय आरोपीला दोषी ठरविले आहे. आरोपीच्या शिक्षेवर २८ नोव्हेंबर रोजी पुढील सुनावणी होणार आहे.