कोलवा पोलिसांची कारवाई : भाडेकरूच्या अनैसर्गिक मृत्यूमुळे प्रकार उघडकीस
मडगाव : बाणावली येथील ग्रेस इमाराल्ड प्लाझातील फ्लॅट इंग्लंड येथील रहिवासी जेन अॅन डंबाविन यांना भाड्याने देण्यात आला होता. पण, सदर फ्लॅट भाड्याने दिल्याचा ऑनलाईन सी फॉर्म भरला नव्हता. याप्रकरणी फ्लॅट मालक ज्योकीम रॉड्रिग्ज व पॉवर ऑफ अॅटर्नी लविनिया गोमिंडिस यांच्याविरोधात कोलवा पोलिसांनी गुन्हा नोंद केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, इंग्लंड येथील जेन अॅन डंबाविन व त्यांचे पती फिलीप रिचर्ड डंबाविन यांच्यासह बाणावली येथील ग्रेस इमाराल्ड प्लाझातील बीएफ ३ या फ्लॅटमध्ये ४ नोव्हेंबरपासून भाड्याने वास्तव्यास होते. २४ रोजी जेन अॅन डंबाविन यांच्या छातील दुखू लागले व त्यांना रुग्णवाहिकेने दक्षिण गोवा जिल्हा इस्पितळात दाखल करण्यात आले. जेन यांना १३ वर्षांपूर्वी हृदयविकाराचा झटका आलेला होता. तेव्हापासून त्यांच्यावर वैद्यकीय उपचार सुरू होते. उपचारादरम्यान जेन डंबाविन यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी कोलवा पोलिसांनी चौकशीअंती कोणताही घातपाताचा प्रकार आढळला नाही व त्यांनी अनैसर्गिक मृत्यूची नोंद केली होती.
कोलवा पोलिसांनी केलेल्या चौकशीवेळी या परदेशी नागरिकांच्या वास्तव्य असलेल्या फ्लॅटमालकांकडून फ्लॅट भाड्याने देत असल्याची कोणतीही माहिती ऑनलाइन फॉर्म सीमध्ये भरलेली नाही व परदेशी नागरिक राहत असल्याची माहिती दिली नसल्याचे आढळून आले. परदेशी नागरिकाला जागा भाड्याने दिली असल्यास परदेशी प्रादेशिक नोंदणी कार्यालयाला माहिती देण्याची आवश्यकता आहे. मात्र, तसे न झाल्याने कायद्यानुसार कारवाई केली. त्यानुसार आता कोलवा पोलिसांनी फ्लॅट मालक ज्योकीम रॉड्रिग्ज व पॉवर ऑफ अॅटर्नी लविनिया गोमिंडिस यांच्याविरोधात गुन्हा नोंद केला आहे.