मुख्याधिकाऱ्यांच्या केबिनमधील प्रकार : पोलिसांत तक्रार दाखल
मडगाव : मडगाव पालिकेच्या अभियंत्याला मुख्याधिकार्यांच्या केबिनमध्ये नगरसेवक सदानंद नाईक यांच्याकडून मारहाण करण्याचा व धमकी देण्याचा प्रकार घडला. याप्रकरणी मुख्याधिकारी मेलविन वाझ यांच्याकडून मडगाव पोलीस ठाण्यात तक्रार दाखल करण्यात आली आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, २२ रोजी दुपारी दीडच्या सुमारास ही मारहाणीची घटना घडली. नगरसेवक सदानंद नाईक व मडगाव पालिकेचे सहाय्यक अभियंता विनय देसाई यांच्यात एका कामासंदर्भातील फाईल्सच्या विलंबावरून वाद झाला. मुख्याधिकारी मेलविन वाझ यांच्या केबिनमध्ये असताना आपल्या प्रभागातील कामे सोडून अभियंता विनय देसाई दुसर्या प्रभागातील कामांना प्राधान्य देत असल्याच्या रागातून सदानंद नाईक यांना राग अनावर झाला. शाब्दिक वाद घालतानाच शिवीगाळ करण्यास सुरुवात केल्यानंतर अभियंत्याकडूनही प्रत्युत्तर येत गेली. रागाच्या भरात सदानंद नाईक यांनी अभियंता विनय याला लाथेने मारहाण केली. त्यानंतर विनयला मुख्याधिकारी मेलविन यांच्या खुर्चीच्या दिशेने ढकलून दिले. यावेळी मेलविन यांच्याही कोपराला मार बसला.
या प्रकारानंतर सहकारी नगरसेवकांनी सदानंद नाईक यांना मुख्याधिकारी मेलविन यांच्या केबिनबाहेर नेले. याप्रकरणी सहाय्यक अभियंता विनय देसाई यांनी मुख्याधिकारी वाझ यांना तक्रार अर्ज सादर केला होता. त्यानुसार सोमवारी मुख्याधिकारी मेलविन वाझ यांनी मडगाव पोलीस ठाण्यात सदानंद नाईक यांच्याविरोधात तक्रार दाखल करत कायद्यानुसार कारवाई करण्याची मागणी केली आहे.