पाच ज्ञानेद्रियांपैकी एक इंद्रिय म्हणजे कान. आपल्याला दोन कान आहेत. कानांनी ऐकू येतं म्हणून आपल्याला वेगवेगळ्या गोष्टी समजतात.
कानाचे एकूण ३ भाग आहेत - बाहेरचा, मधला आणि आतला भाग. बाहेरच्या व मधल्या भागामध्ये कानाला एक पडदा असतो.
कानाची योग्य काळजी घेणे अत्यंत आवश्यक आहे कारण कान आपल्या शरीराचा समतोल म्हणजेच बॅलन्स ठेवायला सुद्धा मदत करतात.
कानांची काळजी कशी घ्यावी?
कानात विविध वस्तू घालून ते साफ करण्याची सवय असेल तर ती आधी सोडून द्यायला हवी.
कानातील मळ काढून टाकण्यासाठी त्यात पीन, पेन्सिल, बड्स घातले जातात. यामुळे मळ बाहेर येण्याऐवजी आत ढकलला जातो. त्यामुळे तो सुकून बाहेर पडण्याची शक्यता कमी होते. हा मळ साचून कडक झाला तर मग कमी ऐकू येते, खाज येते. कानात इन्फेक्शनसुद्धा होऊ शकते.
कानात टोकदार वस्तू घातल्या असता कानाच्या पडद्याला छिद्र पडू शकते.
गाडीवरून फिरताना कानात धूळ, वारा जाऊ नये म्हणून स्कार्फ किंवा टोपीने कान झाकावे.
सतत फोनवर बोलल्याने, मोठ्या आवाजात गाणी ऐकल्याने, सतत कानात इयर फोन्स घातल्याने श्रवण क्षमतेवर परिणाम होतो. म्हणून या गोष्टी सतत करणे टाळावे.
आंघोळ झाल्यानंतर स्वच्छ टॉवेलने कान आतून व बाहेरून नीट पुसावे.
असे केल्याने कान स्वच्छ व निरोगी राहतात.
कानाला काही त्रास झाला, कान दुखू लागला तर लवकरच डॉक्टरकडे जाऊन कान तपासून घ्यावे.
तुम्हाला एक गंमत माहीत आहे का???
पूर्वी शाळेत अभ्यास, गृहपाठ केला नाही तर शिक्षक किंवा शिक्षिका मुलांचे कान पकडत, कानाच्या पाळीला पकडून उठाबश्या काढायला लावत. कान पिळले की बुद्धी वाढते असं म्हणतात. आहे की नाही गंमत?
वैद्य कृपा नाईक, आयुर्वेदाचार्य