अपहरण, लैंगिक अत्याचारप्रकरणी हैदराबादच्या युवकाची निर्दोष सुटका

पीडित मुलीसह वडिलांची उलटतपासणी न झाल्याचा फायदा

Story: प्रतिनिधी। गोवन वार्ता |
17 hours ago
अपहरण, लैंगिक अत्याचारप्रकरणी हैदराबादच्या युवकाची निर्दोष सुटका

पणजी : बार्देश तालुक्यातील १७ वर्षीय मुलीचे २०१२ मध्ये अपहरण करून तिच्यावर लैंगिक अत्याचार करण्यात आले होते. या प्रकरणातील पीडित मुलगी आणि तिच्या वडिलांची न्यायालयात उलटतपासणी करण्यात अपयशी ठरल्याचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित शाहनवाज शेख उर्फ मोहम्मद शाहनवाज (मूळ हैदराबाद) याची निर्दोष सुटका केली आहे. याबाबतचा आदेश न्या. दुर्गा मडकईकर यांनी दिला.
या प्रकरणी पी​डित मुलीच्या वडिलांनी मुलगी बेपत्ता असल्याची तक्रार ३ ऑक्टोबर २०१२ रोजी पर्वरी पोलीस स्थानकात केली होती. त्यानुसार, संशयित शाहनवाज शेख या युवकाने पीडित मुलीचे अपहरण केल्याचे म्हटले होते. त्यानुसार, पोलिसांनी या प्रकरणी संशयित शेख याच्या विरोधात अपहरणाचा गुन्हा दाखल केला. त्यानंतर पोलिसांनी चौकशी केली असता, पीडित मुलगी दिल्लीत असल्याची माहिती मिळाली. त्यानुसार, पर्वरी पोलिसांनी ३१ ऑक्टोबर २०१२ रोजी दिल्ली येथील सिलमपूर पोलीस स्थानकाच्या परिसरात भाड्याच्या खोलीत वास्तवास असलेल्या पी​डित मुलीची सुटका केली. त्यावेळी पोलिसांनी संशयित शाहनवाज याला ताब्यात घेऊन गोव्यात आणून अटक केली. त्यानंतर पी​डित मुलीची वैद्यकीय तपासणी केली असता, तिच्यावर लैंगिक अत्याचार केल्याचे समोर आले. तसेच संशयिताने तिच्याशी लग्न करण्याचे आमिष दाखवून तिला दिल्लीत नेल्याचे समोर आले. त्यानुसार, पोलिसांनी संशयित शेख याच्या विरोधात लैंगिक अत्याचाराच्या गुन्हा दाखल करून कारवाई केली. याच दरम्यान १५ जानेवारी २०१३ रोजी न्यायालयाने संशयित शाहनवाज याची सशर्त जामिनावर सुटका केली. या प्रकरणी पोलिसांनी तपासपूर्ण करून संशयितांविरोधात ३० जून २०१३ रोजी न्यायालयात आरोपपत्र दाखल केले. त्यानंतर न्यायालयाने या प्रकरणातील प्रथमदर्शनी पुराव्याची दखल घेऊन ७ नोव्हेंबर २०१६ रोजी संशयितांविरोधात आरोप निश्चित करून खटला सुरु केला.
या प्रकरणी न्यायालयात सुनावणी झाली असता, अनेकदा संधी देऊन पिडीत मुलगी आणि तिचे तक्रारदार वडिलांना उलटतपासणीसाठी न्यायालयात हजर करण्यात अपयशी ठरले. या बाबतचे निरीक्षण नोंदवून न्यायालयाने संशयित शाहनवाज याला निर्दोष सुटका केली आहे.