संशयितांना न्यायालयीन कोठडी : मांद्रेकरची अटकपूर्व जामिनासाठी धाव
म्हापसा : कुचेली कोमुनिदादच्या मालकीच्या खडपावाडा येथील जमीन हडप प्रकरणी अटक केलेले संशयित आरोपी रमेश राव व शकील शेख यांना म्हापसा न्यायालयाने १४ दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावली आहे. दोन्ही संशयित आरोपींनी जिल्हा न्यायालयात जामीन अर्ज तर संशयित राजू मांद्रेकर (रा. तीनमाड, कामुर्ली) याने अटकपूर्व जामिनासाठी धाव घेतली आहे.
या एकंदरीत कोमुनिदाद जमीन घोटाळ्यामध्ये कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाली असून कोमुनिदाद समिती, स्थानिक लोकप्रतिनिधी, म्हापसा पालिका अधिकारी व कोमुनिदाद टेनंट यांच्या संगनमताने कुचेलीतील काही गुन्हेगारी प्रवृत्तीच्या व्यक्तींनी हे पीडितांना भूखंड देऊन फसवणुकीचे षडयंत्र रचले होते, अशी माहिती पोलीस कारवाईनंतर उघडकीस आली आहे.
बुधवार, दि. २० रोजी सकाळी फिर्यादी पीडितांनी मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत यांची भेट घेऊन कैफियत मांडली होती. त्यानंतर दुपारी म्हापसा पोलिसांनी फिर्यादी सुश्मिता दामोदर हरमलकर (रा. फ्रेतसवाडा, वेर्ला काणका) व इतर सहा-सात जणांच्या तक्रारीच्या आधारे भा.न्या.सं.च्या ६२(२)(अ), ३१६, ३१८, १११(३) व ३(५) कलमान्वये गुन्हा नोंद केला होता. हा फसवणुकीचा प्रकार दि. १ जानेवारी २०१८ ते दि. १५ नोव्हेंबर २०२४ या कालावधीत घडला होता.
भूखंडाचे हक्क फिर्यादींच्या नावावर हस्तांतरित करण्यासाठी कायदेशीर औपचारिकता पूर्ण करण्याची हमी देत फिर्यादी पीडितांकडून एकूण ३८.४९ लाख रुपये उकळले होते.